नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही बदल घडले तरी आम्ही पाकिस्तानच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे वक्तव्य चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी केले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील परराष्ट्र मंत्री स्तरावरील धोरणात्मक चर्चेवेळी वँग यी यांनी ही भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, जागतिक स्तरावर किंवा आशियाई प्रदेशात गोष्टी कितीही बदलल्या तरी आम्ही पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे वँग ली यांनी सांगितले. या भूमिकेबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी चीनचे आभार मानले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करायचा सुरुवात केली होती. गेल्याच महिन्यात बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक करत भारताने पाकला जोरदार झटका दिला होता. यानंतर युद्धाच्या शक्यतेने दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. मात्र, भारताने सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करत पाकिस्तानची चांगलीच जिरवली होती. या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा देत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. 


मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नातही चीनने नुकताच खोडा घातला होता. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीपुढे यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. मात्र, चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करत हा प्रस्ताव हाणून पाडला. लवामाचा हल्ला अत्यंत भीषण असल्यामुळे अनेक देशांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला होता. यामध्येही चीनचाही समावेश होता. त्यावेळी चीनने दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा वापर करू, असेही म्हटले होते. मात्र, चीनने मसूद अजहरला वाचवून आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.