जयपूर : पाच राज्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. कोणाची सत्ता येणार आणि कोणाची जाणार याची चर्चा देशभर रंगू लागलीय. त्यातच विविध संस्थांनी सत्तेचं भाकीत वर्तवणारे सर्व्हे सुरू केले आहेत. अशाच एका सर्व्हेत राजस्थानची जनता परंपरेनुसार सत्तांतराच्या बाजूनं कौल देणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय.  टाईम्स नाऊ आणि सीएनएक्सनं केलेल्या सर्व्हेत काँग्रेसची बहुमतानं सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपची दाणादण होणार असून भाजपचा दारूण पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा काय अंदाज देण्यात येत असला तरी राजस्थानमध्ये सत्तापरिवर्तन होऊन काँग्रेसच्या हाती सत्ता येऊ शकते, असा अंदाज टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून पुढे आला आहे. २०० सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसला ११० ते १२० जागा तर सत्ताधारी भाजपला ७० ते ८० जागा मिळतील, असे हे सर्वेक्षण सांगत आहे.  



दरम्यान, २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या २१ तर भाजपला १६३ जागा मिळाल्या होत्या. केंद्र आणि राज्यातील सरकारच्या कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्राला चांगला शेरा मिळाला आहे तर राज्यातील सरकारला नापास ठरवण्यात आले आहे. 


केंद्रातील मोदी सरकार चांगलं काम करत आहे, अशी प्रतिक्रिया ६३ टक्के लोकांनी दिली तर वसुंधराराजे सरकारला केवळ २५ टक्के लोकांनीच पसंती दिली. १२ टक्के लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असल्याचे मत ३५ टक्के लोकांनी नोंदवले तर विकास हा मुख्य मुद्दा असेल, असे २७ टक्के लोकांचे मत आहे. वसुंधरा राजे यांच्या कारभारावर ४८ टक्के लोकांनी नापसंती व्यक्त केली आहे. राजस्थानातील सर्व विधानसभा मतदारसंघांतून एकूण ८ हजार ४० लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आलेत.