आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, भाजप-शिवसेना आता आमने-सामने
महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही शिवसेना-भाजप आमने-सामने
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक आणले जाणार आहे. या विधेयकावरूनच भाजप आणि शिवसेना आमने सामने पाहायला मिळणार आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी याआधीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावरुन शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली हे निश्चित झालं होतं. मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेने भाजपसोबतची युती सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारांना विरोधकांच्या बाकांवर जागा देण्यात आली आहे. म्हणजेच आता शिवसेनेचे खासदार विरोधकांसोबत बसणार आहेत. त्यामुळे आता भाजपचा कोणकोणत्या मुद्द्यांवर विरोध करते आणि कोणत्या मुद्द्यांवर संसदेत साथ देते याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील सत्ता समीकरणांमुळे अखेर आज सेना-भाजपतील युती तुटली. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपनं केली होती. संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रात ते काँग्रेसशी जुळवण्याचा प्रयत्न त्यामुळे त्यांना विरोधी बाकांवर जागा देण्यात येत आहे असं प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं होतं.