देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ५९,५४६ इतके रुग्ण आहेत.
नवी दिल्ली: लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ७,४६६ नवे रुग्ण आढळून आले. तर काल दिवसभरात १७५ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १,६५,७९९ इतका झाला आहे.
महाराष्ट्रातील या शहरांत लॉकडाऊन सुरुच राहण्याची शक्यता
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ८९,९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७१, १०५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४,७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत भारताने आता चीनला मागे टाकले आहे.
गृहमंत्री अमित शाहंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; लॉकडाऊन ५ लागू होणार?
देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ५९,५४६ इतके रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू १९,३७२, गुजरात १५,५६२ आणि दिल्लीत कोरोनाचे १६,२८१ रुग्ण आहेत. दरम्यान, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालवधी उद्या संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्मंत्र्यांकडून सूचना मागवल्या आहेत. जून महिन्यात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचण्याचा (पिक पॉईंट) अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे मजुरांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलातंर सुरु आहे. तसेच इतर देशांतून देखील लोकांना भारतात आणून क्वारंटाईन केलं जात आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.