India Strikes Back : पुलवामा हल्ल्यानंतर २४ तासांतच मोदींनी घेतला होता मोठ्या कारवाईचा निर्णय
बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.
नवी दिल्ली : India Strikes Back जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे १४ फेब्रुवारीला जैश- ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचे प्राण गेले. या भ्याड हल्ल्याचं उत्तर देण्याची मागणी साऱ्या देशातून करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा देशातील जनतेला याविषयीचं आश्वासन दिलं. या हल्ल्याचं उत्तर म्हणून भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशवादीतळांवर हल्ला केला. या संपुर्ण कारवाईचा निर्णय पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या चोवीस तासांच घेतला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्याच्या नंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई करत वायुदलाने ही कारवाई केली असली, तरीही त्यासंबंधीचा निर्णय मात्र फार आधीच घेण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींनी पाकिस्तानला दणका दिल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 'जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही', असं म्हणत पाकिस्तानचं समर्थन असणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून मोठी चूक करण्यात आली आहे. आता त्यांना याची शिक्षा मिळणारच अशा आशयाचं वक्तव्य करत मोदींनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. ज्याचेच पडसाद मंगळवारी उमटल्याचं पाहायला मिळालं. २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्यच्या सुमारास भारतीय वायुदला १२ लढाऊ विमानांच्या ताफ्याने LOC ओलांडत ही कारवाई केली.
मिराज २००० या विमानांच्या सहाय्याने वायुदलाने ही कारवाई निकालात काढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास २१ मिनिटं पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुदलाच्या विमानांबी बॉम्बहल्ले सुरु केले. १००० किलो वजनाचे हे बॉम्ब टाकत दहशतवादी संघटनांचे एकूण तीन कंट्रोल रुम उध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर साऱ्या देशात उसळलेली संतापाची लाट पाहता हल्ल्याचं उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलाच्या आणि वायुदलाच्या इतिहासातील ही आणखी एक मोठी कारवाई ठरत आहे.