छत्तीसगड : एरवी नक्षली कारवायांसाठी प्रसिद्ध असलेला छत्तीसगडचा दंतेवाडा जिल्हा. मात्र सध्या दंतेवाड्यामध्ये वेगळीच चर्चा आहे. इथल्या रस्त्यावर सध्या काही नव्या कोऱ्या ई-रिक्षा दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष ? विशेष हे की या रिक्षांमध्ये रिक्षावाला नाही आहे तर रिक्षावाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगडमधला दंतेवाडा जिल्हा म्हणजे नक्षलवाद्यांचा तळ. पोलीसही तिथं एकटं-दुकटं जायला घाबरतात. पण सुखमती आणि तिच्यासारख्या आणखी ५० जणी या रस्त्यांवर बिनधास्त ऑटो चालवतात. या ५१ जणींना ई-ऑटो चालवण्याचं रितसर प्रशिक्षण देण्यात आलंय. विशेष म्हणजे या सर्व महिला ऑटो चालक दारिद्र्य रेषेच्या अतिशय खालच्या गटातल्या आहेत.


गेल्या महिन्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी या ५१ महिलांना ई-ऑटोचं वाटप केलं. गेल्या महिनाभर बचत गटाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित करण्यात आलं. आता गटाच्या कार्यकर्त्या त्यांना नाश्ता-जेवण पोहोचवतात. त्यांच्या ई-ऑटोचं चार्जिंग करण्याचीही सोय बचत गटातर्फेच करण्यात आली आहे.  


विशेष म्हणजे या ई-ऑटोमध्ये महिला चालकांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. या महिला चालकांना वन-क्लिक अॅप देण्यात आलं आहे. धोकादायक परिस्थितीमध्ये नजिकच्या पोलीसांना त्याची सूचना देण्याची सोय आहे. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणं सोपं आहे. पण दंतेवाडासारख्या अतीदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात महिलांना दिलेला हा आधार केवळ आर्थिक नाही, तर सामाजिकही आहे.