अमृतसर: रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी अमृतसरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये नातेवाईकांना गमावल्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा अनेक करुण कहाण्या आता समोर येत आहेत. यामध्ये अवघ्या दहा महिन्यांच्या विशालची कहाणी अनेकांच्या हदयाला चटका लावून जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावण दहनाच्या या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामध्ये ५५ वर्षांच्या मीना देवीही रेल्वे रुळापासून दूर काही अंतरावर गर्दीत उभ्या होत्या. सर्वजण रावण दहनाचा सोहळा पाहण्यात मग्न असतानाच मीना देवी यांना समोरून एक्स्प्रेस गाडी धडाडत येताना दिसली. 


पुढच्याच क्षणी मीना देवी यांच्यासमोर असलेल्या माणसाला गाडीची धडक बसली. मात्र, त्यापूर्वी त्याने स्वत:च्या हातातील लहान मुलाला हवेत फेकले. अवघ्या काही सेकदांमध्ये ट्रेन त्याला चिरडून निघून गेली. याचवेळी मीना देवी हवेत फेकलेल्या चिमुरड्याला पकडण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यांनी या मुलाला कसेबसे झेललेही, मात्र त्याचे डोके जमिनीवर आपटले. परंतु, मीना देवी यांनी त्याला फारशी दुखापत होऊ दिली नाही. 


यानंतर मीना देवी या चिमुरड्याला आपल्या घरी घेऊन गेल्या. अपघातामध्ये या मुलाचे पालक मारले गेले असतील तर मुलाचा सांभाळ करण्याची तयारीही मीना देवी यांनी दाखविली होती. 


मात्र, पोलिसांनी शोध घेऊन या मुलाच्या घरच्यांना शोधून काढले. चौकशीअंती या लहानग्याचे नाव विशाल असून तो दहा महिन्यांचा असल्याची माहिती पुढे आली. विशालवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी सीटीस्कॅन करण्यात येणार आहे. 


या अपघातात विशालची आई गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावरही उपचार सुरु आहेत. तर विशालचे वडील बुद्धीराम यांचा मृत्यू झाला आहे. विशालच्या घरी त्याची मावशी आहे. मात्र, तिनेही आपला पती आणि मुलाला या अपघातामध्ये गमावले आहे.