प्रसुतीनंतर अवघ्या चार तासात `ती` पोहचली परीक्षा केंद्रावर...
शिक्षणाची आवड इतकी की ती प्रसुतीनंतर अवघ्या चार तासात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहचली.
मढोरा : शिक्षणाची आवड इतकी की ती प्रसुतीनंतर अवघ्या चार तासात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहचली. तिला पाहिल्यानंतर तिथे उपस्थित ऑफिसर्स, मजिस्ट्रेट आणि शिक्षक आश्चर्यचकीत झाले. नवजात बालकाला घेऊन परीक्षा देणे शक्य नसल्यासारखे दिसत होते. अजूनही ती प्रसुतीच्या त्रासातून पूर्णपणे सावरली नव्हती. मात्र तिच्या जिद्दीपुढे कोणाचे काही चालले नाही. तिच्या जिद्दीने प्रभावित झालेल्या अधिकाऱ्यांनी बाळाच्या सांभाळासाठी त्याच्या आजीला परीक्षा केंद्रात थांबण्याची परवांगी दिली. त्यानंतर महिलेने परीक्षा देण्यास सुरूवात केली. पेपर लिहिताना अनेकदा तिची नजर बाळाकडे जात होती. पण क्षणातच सावरून ती पुन्हा पेपर लिहीत होती.
कोण आहे ती महिला?
या महिलेचे नाव बबिता कुमारी असून ती मढोरा बिंद टोलाची निवासी आहे. बुधन महतो असे तिच्या पतीचे नाव आहे.
बबिताचा विवाह वर्षभरापूर्वी भगवान महतो यांचे पुत्र बुधन महतो यांच्याशी झाला.
बबिताचा पती मजूरी करतो.
बुधवारी तिची परीक्षा होती. मात्र त्याचवेळी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या.
सकाळी तिला मढोराच्या रेफरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तिने मुलाला जन्म दिला.
बबिताचा परीक्षा देण्याचा निश्चय पक्का होता. त्यामुळे हॉस्पिटलमधून तिला थेट आदर्श राजकीय मध्य स्कूलमध्ये परीक्षेसाठी नेण्यात आले.
परीक्षा केंद्रावर बाळाचे आकर्षण
परीक्षा केंद्रावर बाळ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी बाळाला बघण्यासाठी येत होते. सगळ्यांनी पुत्ररत्न लाभल्याबद्दल बबिताचे अभिनंदन केले. तर त्रास होत असतानाही परीक्षा पूर्ण केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. केंद्रावर टु्डीवर असलेल्या मजिस्ट्रेटने बबिताचे कौतुक केले. या सगळ्या प्रकरणाबद्दल बबिता म्हणते की, पती जरी मजूरी करत असले तरी मला शिकण्याची इच्छा आहे आणि मी शिकत राहीन.