मुंबई : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने याप्रकरणी गुन्ह्यांना स्थगिती दिल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी काही खूप मोठा अपराध केलेला नसल्याचे ते यावेळी म्हणाल्या. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणात मी जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप काहीही करतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणं गरजेचं नसल्याचे त्या म्हणाल्या. भाजपने त्यांच्या नेत्यांवर किती गुन्हे दाखल आहेत ते बघावं असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला.


अमरावतीच्या राजापेठ परिसरात यशोमती यांची गाडी एका पोलीसाने आडवली होती. त्यामुळे संतप्त यशोमती ठाकूर आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीसाला मारहाण केली होती. या प्रकरणी अमरावती न्यायालयाने तिघांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. 



त्यामुळे आता भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या म्हणाल्या, 'याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता एका महिलेमागे संपूर्ण भाजप लागणार. भाजप आणि आमच्यात विचारांची लढाई आहे. पण त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी विचारांची लढाई आम्ही लढत राहणार.'


असं म्हणत माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळणार असा विश्सास देखील त्यांनी याठिकाणी व्यक्त केला. दरम्यान, अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.