Bank Robbery Video: बँकेच्या गेटवर `त्या` दोघी बसलेल्या असतानाच शस्त्र घेऊन दरोडेखोर घुसले, त्यानंतर...; व्हिडीओ व्हायरल
बिहारमध्ये दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बँकेत चोरी करण्याचा कट उधळून लावला. सशस्त्र चोरांसह झालेल्या छटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
Bihar Bank Robbery: बिहारमध्ये दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी शौर्य दाखवत बँकेवरील दरोडा रोखल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाजीपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सशस्त्र चोर बँकेत घुसताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी चोरांना रोखण्याचं ठरवलं. यावेळी त्यांची चोरांसह छटापट झाली.
दोन्ही महिला पोलीस कर्मचारी बँकेच्या सुरक्षेसाठी गेटवर तैनात होत्या. यावेळी त्यांनी तीन चोर शस्त्र घेऊन बँकेत शिरत असल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर त्या तात्काळ त्यांना रोखण्यासाठी पुढे सरसावल्या. जुही कुमारी आणि शांती असं या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मास्क घालून आलेले चोर जेव्हा बँकेत प्रवेश कऱण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा सुरक्षारक्षकाने कागदपत्रं दाखवण्यास सांगितलं. यावेळी एका चोराने पिस्तूल बाहेर काढलं. यावेळी जुही आणि शांती उभ्या राहिल्या आणि चोरांना आव्हान दिलं. चोरांनी दोघींचं शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण महिला पोलीस कर्मचाऱी कडवी झुंज देत असल्याचं पाहिल्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला.
जुही कुमारी या झटापटीत जखमी झाली आहे. जुही कुमारीने पळून जाणाऱ्या चोरांवर गोळी झाडली आणि चोरीचा कट उधळला. "मी तिघांनाही बँकेत काम आहे का अशी विचारणा केली. यावर त्यांनी होकार दिला असता मी पासबुक दाखवण्यास सांगितलं. यानंतर त्यांनी पिस्तूल बाहेर काढली," अशी माहिती जुही कुमारीने दिली आहे.
"आम्हीदेखील त्यांना बंदूक दाखवली असता त्यांनी ती खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत माझे दात तुटले आणि हाताला जखम झाली. आम्ही यानंतर त्यांना रोखत होतो. अखेर त्यांना पळ काढला," असं त्यांनी सांगितलं आहे.
"कोणत्याही परिस्थितीत त्यांना बँक लुटू द्यायची नाही असं आम्ही ठरवलं होतं," असं शांती यांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.