मुंबई : रेल्वे प्रवास किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. रेल्वे प्रवासात एका महिलेची पर्स हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण या व्हिडिओने प्रवाशांनी किती सतर्क राहणं गरजेचं आहे हे अधोरेखित केलं आहे. रेल्वे प्रवास हा सोईचा प्रवास म्हणून ओळखला जातो. पण अशा घटनांनी या प्रवासाला गालबोट लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओतील संबंधित महिला दरवाजात उभी होती. गाडी स्लो झाल्यानंतर दोन चोरट्यांपैकी एक जण धावत्या गाडीत घुसला. त्यानं तिच्या हातातली पर्स हिसकावून खाली उडी मारली. त्यानं दिलेला हिसका एवढा जोरदार होता की महिला ट्रेनबाहेर पडत होती. पण सहप्रवाशानं महिलेला हात धरुन आत खेचलं. सुरुवातीला हा व्हिडिओ इंद्राय़णी एक्स्प्रेसमधला असल्याचा दावा करण्यात येत होता. पण मध्य रेल्वेनं इंद्रायणी एक्स्प्रेसमधे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा दावा केला आहे. शिवाय हा व्हिडिओ मध्य रेल्वेच्या अखत्यारितलाही नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केला आहे.


पण असे असले तरीही प्रवास करताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. प्रवासाला बाहेर पडताना प्रत्येक महिला ही आपल्या पर्समध्ये काही किंमती गोष्टी, मोबाईल आणि महत्वाची रोकड रक्कम सोबत ठेवते. याच तयारीचा फायदा हे चोरटे घेऊन पर्स हिसकावतात. अशावेळी महिलांनी आपल्या सामानाची आणि त्याचबरोबर तब्बेतीची काळजी घेणं आवश्यक असणार आहे. या घटनेत आपण पाहू शकतो की, महिलेला सहप्रवाशाने सांभाळलं नसतं तर त्या महिला ट्रेन खाली कोसळल्या असत्या. अशा घटनांमध्येच प्रवाशांचा जीव जातो.