इंदूर : इंदूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केला. तसेच त्याचा व्हिडिओही बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी इंदूर पोलिसांनी शाळेतील तीन शिक्षिकांना ताब्यात घेतलं असून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या शिक्षिकांनी आरोप फेटाळले आहेत. 


इंदूर पोलीस अधिक्षक वंदना चौहान यांनी सांगितले की, छात्रीपूरा परिसरात असलेल्या शाळेत पीडित विद्यार्थीनी शिकते. या शाळेतील तीन शिक्षिकांनी तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचा आरोप आहे. या आरोपानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पीडित मुलीने आरोप केला आहे की, दोन शिक्षिका तिचा लैंगिक छळ करत असे आणि तिसरी शिक्षिका त्याचा व्हिडिओ शूट करत असे. आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शूट करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित विद्यार्थीनीने पोलिसांना ती जागाही दाखवली ज्या ठिकाणी तिचा कथित स्वरुपात लैंगिक छळ केला जात असे. 


ही घटना समोर आल्यानंतर शाळेतील पालकांनी प्रचंड गोंधळ घातला. तसेच आरोपी शिक्षिकांवर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, शिक्षिकांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. एका शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, मी त्या मुलीसोबत कधी बोललेही नाही. कारण, मी त्या इयत्तेला शिकवतच नाही. तर दुसऱ्या शिक्षिकेने सांगितले की, मी गेल्या १५ दिवसांपासून या मुलीला भेटलीच नाही. त्या मुलीने जे काही सांगितलं ते सर्व खोटं आहे.