नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत महिलांना बस आणि मेट्रोने मोफत प्रवास करता येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल अशा वाहतुकीच्या कोणत्याही साधनाने त्यांना प्रवास करणे शक्य होईल, असे केजरीवाल यांनी सांगितले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांमध्ये होईल. देशातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतल मेट्रो आणि लोकलसेवा अधिक महागडी आहे. बससेवांची तिकीटं कमी असली तरी महिलांना बसचा प्रवास सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे दिल्ली सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत 'आप'चा दारूण पराभव झाला होता. दिल्लीतील सात मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ 'आप'ला जिंकता आला नव्हता. अशातच २०२० साली दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल अनेक लोककल्याणकारी योजनांची घोषणा करणार असल्याची चर्चा राजकीय होती. आजच्या घोषणेने त्याची सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.


मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा ५०-५० टक्के वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे का, असा प्रश्नही केजरीवाल यांना विचारण्यात आला. त्यावर यासाठी दिल्ली सरकार अनुदान देत असल्याने केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.