नवी दिल्ली : देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र ज्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नाही त्या राज्यात 20 एप्रिलपासून काही क्षेत्रांतील कामकाज सुरु होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, ज्या सेवांना सोमवारपासून सूट देण्यात येत आहे, त्याची एक यादी तयार करण्यात आली आहे. ही सूट उद्या म्हणजेच सोमवार 20 एप्रिलपासून सुरु होत आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करत एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये आरोग्य सेवा, शेती, फलोत्पादन, मत्स्यपालन व पशुसंवर्धन यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर, बंद दरम्यान गृह मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट देण्यात आली आहे. परंतु राज्य सरकारदेखील त्यांच्या पद्धतीने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करु शकतात. 


सरकारने ग्रामीण भागातील, सहकारी पतसंस्था, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, पाणीपुरवठा, वीज आणि दळणवळणाशी संबंधित प्रकल्प आणि उपक्रमांना सरकारने सूट दिली आहे. 



त्याशिवाय सरकारने बांबू, नारळ, सुपारी, मसाल्यांची लागवड, कापणी, प्रोसेसिंग, पॅकेजिंग, फळ आणि भाजीपाल्याच्या गाड्या, किराणा व रेशन दुकानं, डेअरी आणि दुध बूथ, पोल्ट्री, मांस, मासे, चारा विकणारी दुकानं, इलेक्ट्रीशियन, आयटी दुरुस्ती, सरकारी कार्यालये, औषध- फार्मा आणि वैद्यकीय उपकरण कंपन्या, प्लंबर, मोटर मेकॅनिक, कारपेंटर, कुरिअर, डीटीएच आणि केबल सेवा दुकानांना काही निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे.


काही निर्बंधांसह ट्रक रिपेअरसाठी महामार्गांवर दुकानं आणि ढाबेदेखील सुरु राहतील. ग्रामीण भागांत विट भट्टी आणि फूड प्रोसेसिंग कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोल्ड स्टोरेज आणि वेयरहाऊस सर्व्हिस सुरु होईल. 


मासेमारी व्यवसायही सुरु होईल. त्यासाठी माशांचं खाणं, मेन्टनंन्स-देखभाल, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि विक्रीसाठी परवानगी आहे. हॅचरी आणि कमर्शियल ऍक्वेरियमही सुरु होणार आहे.


मनरेगा (MNREGA) अंतर्गत असलेल्या कामांसाठीही परवानगी देण्यात आली आहे. शहराबाहेरील रस्ते, सिंचन, इमारत, अक्षय ऊर्जा आणि सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांची कामंही सोमवारपासून सुरु होणार आहेत.