मुंबई : एकीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे, तर दुसरीकडे जगभरातील तब्बल ७३,९६८ कोरोना रूग्ण सुखरूप बरे झाले असल्याची बातमी समोर येत आहे. मृत्यूच्या वाटेतून बाहेर येणाऱ्या रूग्णांमध्ये ५४,२७८ रूग्ण चीनमधील आहे. तर आता चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ८०,९५५ इतकी आहे. कोरोना व्हायरसच्या जाळ्यातून बाहेर येणाऱ्या रूग्णांची संख्या काही अंशी बरी असली तरी या व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याचं लक्षात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील ५४,२७८ रूग्ण बरे झाले असून इराणमध्ये या आजारातून सुटका झालेल्या रूग्णांची संख्या २९५९ इतकी आहे. तर इटलीमध्ये १,९६६, स्पेनमध्ये ५१७ तर दक्षिण कोरियामध्ये ५१० रूग्ण या आजारातून सुखरूप बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी औरंगाबादमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.


भारतात कोरोना रूग्णांची संख्या १०७ पर्यंत पोहोचली आहे. या विषारी जीवाणूचा संसर्ग अधिक होवू नये म्हणून सरकारकडून अनेक महत्त्वपूर्व निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 


राज्यातील ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यामध्ये सर्वात जास्त १५ रुग्ण पुण्यात आहेत. त्याखालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.