International Referee On Brij Bhushan: लैंगिक छळ केल्याच्या मुद्द्यावरुन कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचांनी जबाब नोंदवला आहे. एका महिला कुस्तीपटूने स्वत:ला बृजभूषण सिंहच्या तावडीतून सोडवलं होतं. बृजभूषणला धक्का देऊन ही कुस्तीपटू पळाल्याचं आपण स्वत: पाहिल्याचा दावा या पंचांनी केला आहे. या दाव्यामुळे कुस्तीपटू आंदोलनाला नवीन वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बृजभूषण यांच्या अडचणी वाढतील अशी चर्चा आहे.


कोण आहेत हे पंच?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पंचांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे त्यांचं नाव जगबीर सिंह असं आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार जगबीर हे 2007 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीचे पंच आहेत. त्यांनी एकदा त्यांच्यासमोरच घडलेल्या प्रकरणाचा उल्लेख करत घटनाक्रम सांगितला आहे. बृजभूषण महिला कुस्तीपटूंच्या बाजूला उभे होते. बृजभूषण बाजूला उभे असल्याने या महिला कुस्तीपटूला अवघडल्यासारखं झालं. इतकेच नाही तर आपण एकदा बृजभूषण यांना एका महिला कुस्तीपटूच्या बाजूला उभं असल्याचं पाहिलं होतं. यावेळेस या दोघांमध्ये काहीतरी झटापट झाली आणि या महिला कुस्तीपटूने स्वत:ला बृजभूषण यांच्या तावडीतून सोडवून घेतलं. त्यानंतर तिने बृजभूषण यांना धक्का मारला आणि काहीतरी बडबडत तिथून निघून गेली, असं पंच जगबीर यांनी म्हटलं आहे. 


परदेशातही दिला त्रास


जगबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी ही महिला कुस्तीपटू बृजभूषण सिंह यांच्या बाजूला उभी होती. नंतर ती पुढे उभी राहायला गेली. ती महिला कुस्तीपटू बृजभूषण यांच्यामुळे अव्यस्थ होती. मी अगदी फुकेतमध्ये आणि लखनऊमध्येही बृजभूषण यांना महिला कुस्तीपटूंना त्रास देताना पाहिलं आहे.


2 महिन्यांपासून सुरु आहे आंदोलन


मागील 2 महिन्यांपासून कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांच्या नेतृत्वाखाली कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन (Wrestlers Protest) करत आहेत. बृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याचे आरोप केले जात आहेत. बृजभूषण यांना अटक केली जावी अशी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची मागणी आहे. दिल्ली पोलिसांनी 7 महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीच्या आधारे बृजभूषण यांच्याविरोधात 2 एफआयआर दाखल केल्या आहेत. या प्रकरणातील दिल्ली पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचं समजते. दिल्ली पोलिसांची विशेष तपास टीम पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणी एकूण 208 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. यात तक्रारदार, साक्षीदारांबरोबर बृजभूषण यांचाही समावेश आहे. करण्यात आलेले आरोप आणि एफआयआरमधील दाव्यांच्या आधारे या लोकांची चौकशी केली गेली.