बंगळुरु : 'जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा', असं वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी केलं आहे. येडियुरप्पा यांनी प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना, हे वक्तव्य केलं आहे. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, यात येडियुरप्पा यांचं हे वक्तव्य भाजपाला भोवण्याची शक्यता आहे.महांतेश दोड्डागुदर हे कर्नाटकातील कित्तूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान बेळगावी जिल्ह्यात येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येडियुरप्पा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं, 'आता आराम करत बसू नका. तु्म्हाला वाटत असेल, की एखादा मतदार मतदान करत नाही, तर त्यांच्या घरी जा, त्यांचे हात आणि पाय बांधा, आणि त्यांना महांतेश दोड्डागुदर यांना मत देण्यासाठी उचलून आणा' असा सल्ला येडियुरप्पांनी दिला. येडियुरप्पा यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


कर्नाटकात आधीच भाजपपुढे अडथळ्यांची शर्यत सुरू असताना, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आणखी एक अडचण वाढवली आहे. काँग्रेसने यावर म्हटलं आहे की, येडियुरप्पा हे मतदारांना धमकावत आहेत. कर्नाटक विधानसभेत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे, तर भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे, कर्नाटकच्या राजकारणात विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपले नवनवीन डाव आखत आहेत.