कामाच्या ठिकाणी अनेक कर्मचारी तणावाखाली असतात. पण खांद्यावर आर्थिक जबाबदाऱ्या तसंच नोकरीची गरज यामुळे ताणाच्या या ओझ्याखाली दबत काम केलं जातं. त्यात जर कंपनीनेच आपुलकीने तुमच्याकडे तुम्ही तणावात आहात का? अशी विचारणा केली तर किती बरं वाटेल ना. एका कंपनीच्या एचआरने नुकतंच आपल्या कर्मचाऱ्यांना अशी विचारणा करणारा ई-मेल पाठवला. मात्र  आश्चर्याची बाब म्हणजे ज्यांनी हो असं उत्तर दिलं त्यांना कामावरुन काढण्यात आलं. यानंतर आता त्या कंपनीवर टीकेची झोड उठली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

YesMada ही एक सलून होम सर्व्हिस स्टार्ट-अप कंपनी आहे. कंपनीने कामाच्या ओझ्यामुळे आपण तणावात आहोत असं सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट नोकरीवरुन काढून टाकलं आहे. विशेष म्हणजे कंपनीनेच हा सर्व्हे केला होता. कंपनीच्या HR ने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


एचआरने पाठवलेल्या ईमेलमधून दिसत आहे की, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या तणावाच्या पातळीचं मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं. पण याचा वेगळाच परिणाम झाला आहे. ज्यांना खूप ताण आहे त्यांच्यापासून फारकत घेण्यात आली आहे. 


ईमेलचा व्हायरल स्क्रीनशॉट 


प्रिय टीम;


नुकतंच, कामावरील तणावाबद्दल तुमच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केलं. तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या समस्या शेअर केल्या, ज्याचा आम्ही मनापासून आदर करतो.


निरोगी आणि आश्वासक कामाचं वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध कंपनी म्हणून, आम्ही अभिप्रायाचा काळजीपूर्वक विचार केला आहे. कामावर कोणीही तणावग्रस्त राहू नये याची खात्री करण्यासाठी, आम्ही फार तणाव दर्शविणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून वेगळं होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.


हा निर्णय तात्काळ लागू होईल आणि प्रभावित कर्मचाऱ्यांना अधिक तपशील स्वतंत्रपणे प्राप्त होतील.


तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. शुभेच्छा, एचआर मॅनेजर, येसमॅडम”



ई-मेलमध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि कर्मचाऱ्यांच्या तणावाची दखल घेण्याऐवजी कामावरुन काढून टाकण्याच्या निर्णयामुळे अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 


व्हायरल स्क्रीनशॉटवर टीका करताना एका युजरने म्हटलं आहे की, “सर्वात विचित्र कर्मचारी कपता: येस मॅडम कामाच्या ठिकाणी तणावाचे सर्वेक्षण करतात. जे कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे सांगतात त्यांना काढून टाकले जाते.”


“अलीकडे YesMadam नावाच्या स्टार्टअपने टीम सदस्यांना एक सर्वेक्षण पाठवले की ते किती तणावात आहेत आणि ज्यांनी आपण तणावात आहोत सांगितलं त्यांना काढून टाकलं ,” असा संताप दुसऱ्या एका युजरने व्यक्त केला आहे. अनेक युजर्सने या निर्णयात सहानुभूतीचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने मात्र अद्याप या व्हायरल ई-मेलवर स्पष्टीकरण दिलेलं नाही