मुंबई : देशाच्या राजकीय पटलाची सद्यस्थिती पाहता योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधानपदाविषयी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. राजकारणात सध्या बिकट परिस्थिती उदभवली असून, येत्या काळात देशाच्या पंतप्रधानपदावर नेमकं कोण विराजमान होईल याविषयी स्पष्टपणे काही सांगता येत नसल्याचं ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मदुराई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपलं मत मांडलं. 'सध्या म्हणजेच येऊ घातलेल्या २०१९ या वर्षात भारतात बरीच बिकट राजकीय परिस्थिती पाहाला मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर किंवा देशाचं प्रतिनिधीत्त्वं करण्यासाठी कोणाची निवड होईल हे नेमकं सांगताच येणार नाही. पण, इथे ही लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे ही परिस्थिती तितकीच उत्सुकता वाढवणारीसुद्धा आहे. अतिशय अटीतटीची लढाई राजकारणात पाहायला मिळत आहे', असं ते म्हणाले. 


आपले राजकीय विचार मांडत हिंदू राष्ट्र हा आपला मनसुबा नसून, भारत हे एक धार्मिक राष्ट्र असावं अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रामेश्वरम येथेही त्यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय विचार मांडल्याचं पाहायला मिळालं.


आपण कोणत्याच व्यक्तीला किंवा पक्षाला पाठिंबा देत नाही, असं म्हणत देशातील सध्याची स्थिती, राजकारण, देशापुढे असणारी आव्हानं आणि अस्थिरता पाहता हे देशाच्या भवितव्यासाठी योग्य नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. सोबतच येत्या काळात राजकीय पटलावर होणाऱ्या सर्व हालचाली पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 



पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी बाबा रामदेव सध्या तामिळनाडूमध्ये आहेत. देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने ते येथे दाखल झाले. यावेळी येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात मोफत योगसाधना केंद्र सुरु करण्याच्या विचारात असल्याचंही त्यांनी सांगितलं.