नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य हे नुकतेच उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर योगी आदित्यनाथ आणि मौर्य यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून तर मौर्य फुलपूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते. पण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर योगी आणि मौर्य राजीनामा देतील हे स्पष्ट झालं होतं.


मार्च महिन्यामध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधान सभेच्या निवडणुकीनंतर योगी आणि मौर्य यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. आणि मागच्या आठवड्यात दोघं विधान परिषदेत नियुक्त झाले. आता दोघांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक होईल.