UP Board Topper: प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख आणि लॅपटॉप भेट
उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचं म्हणजे परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना योगी सरकारने विद्यार्थांना एक लाख रुपये आणि लॅपटॉप भेट म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. शिवाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पक्के रस्ते देखील बांधण्यात येणार आहेत. सरकारच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी शनिवारी लोकभवनात दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल घोषीत केला. उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावीचा एकूण निकाल ८३.३१ टक्के लागला आहे. त्यामध्ये ७९.८८ टक्के मुलं तर ८७.२९ टक्के मुली पास झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे, बारावीच्या बोर्डाचा निकाल ७४.६३ टक्के लागला आहे. यामध्ये ८१.९६ टक्के मुली तर ६८.८८ टक्के मुलं पास झाली आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षीचा निकाल अधिक उत्तम लागल्याचं देखील डॉ. दिनेश शर्मा यांनी सांगितले.