Builds Helicopter from Scraps: शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. घरी अठरा विश्व दारीद्र्य, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्ज अशा अनेक संकटांवर मात करत शेतकरी मातीतून सोनं उगवतो. त्यामुळे त्याच्या कष्टाबद्दल संपूर्ण देशाला आदर असतो. शेतकऱ्याचे हेच गुण, कल्पकता त्याच्या मुलांमध्ये उतरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकत आलोय. असेच एक उदाहरणसमोर आलंय. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोरा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे देशभरातून कौतुक होतंय. यामागे कारणंही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोजच्या वापरातल्या वस्तु निरुपयोगी झाल्या की आपण त्या फेकून देतो किंवा काही पैशांच्या मोबदल्यात भंगारवाल्यांना विकतो. पण जरोरातील शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या कौशल्याचा वापर करून भंगार साहित्यापासून हेलिकॉप्टर बनवून सर्वांना चकित केले आहे.


अनिल खजवानिया असे या तरुणाचे नाव असून त्याचे वडील पारंपारिक शेती व्यवसाय करतात. अनिलने अतिशय खडतर परिस्थितीत बीए आणि आयटीआय उत्तीर्ण केले आहे. यानंतर त्याने नोकरी करुन घर संभाळावे अशी अपेक्षा होती पण अनिलच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता. हा विचार त्याला शांत बसू देत नव्हता. हेलीकॉप्टर बनवायची त्याची इच्छा होती. यासाठी खूप खर्च न करता कमी पैशात सुरक्षित हॅलीकॉप्टर बनवण्याचे त्याने ठरवले. यासाठी त्याने भंगार साहित्याची मदत घेतली.


चाळीस दिवस अहोरात्र मेहनत करुन त्याने हेलिकॉप्टरमध्ये तयार केले. यामध्ये हेलीकॉप्टरसाठी उपयोगी असणाऱ्या संपूर्ण साहित्याचा त्याने खुबीने वापर केला आहे. सर्वात आधी त्याने जुन्या मोटारसायकलचे इंजिन विकत घेतले. त्यानंतर इतर पार्ट्स आणि पंखे एकत्र करून हेलीकॉप्टर तयार केल्याचे अनिल सांगतो. त


अनिलने बनवलेल्या हॅलीकॉप्टरमध्ये एक व्यक्ती बसू शकते. सोमवारी याने जमिनीवर पहिली चाचणी घेतली. अनिलची ही चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच तो गगनभरारी घेण्याचा तयारीत आहे. उडणारे पंख बनवण्यात आपण व्यस्त असून मी बनवलेले हॅलीकॉप्टर महिनाभरात आकाशात उडवले जाईल, असे अनिल सांगतो. 


मनात कशी आली इच्छा?


हेलीकॉप्टर बनवण्याचा विचार अनिलच्या मनात कसा आला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनिलने याचे उत्तर दिले आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, सतत काहीना काही धडपड करत राहणे हा अनिलचा स्वभाव आहे. त्यातच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला. यानंतर त्याच्या मनात हेलिकॉप्टर बनवण्याबाबत कुतूहल निर्माण झाले.


या कुतुहलाला मूर्त रुप देण्याचे अनिलने मनाशी पक्के केले. हळूहळू त्याने हॅलीकॉप्टरला लागणारे सर्व पार्ट्स एकत्र करण्यास सुरुवात केली आणि हेलिकॉप्टर बनवण्याचे काम सुरू झाले. 


किती आला खर्च?


हेलीकॉप्टर बनवण्यासाठी लाखो-करोडोंचा खर्च येतो हे आपल्याला माहिती आहे. पण अनिलला हाच खर्च कमी करायचा होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्याने आतापर्यंत या कामावर साधारण 50 हजार रुपये खर्च केले आहेत. तरीही अजून मोठ काम बाकी आहे. हॅलीकॉप्टरचे पंख उडवण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी त्याला त्याच्या घरची मंडळी मदत करत आहेत. अनिलला हॅलीकॉप्टर उडवण्यासाठी लागणारी 1 लाखाची रक्कम वडील रामस्वरूप खजवानिया यांनी गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. 


त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा अनिल लवकरच टाकाऊपासून बनवलेले हॅलीकॉप्टर घेऊन आकाशात उड्डाण घेताना आपल्याला दिसणार आहे.