तुमची औषधं बोगस ? आजार बरा होण्याऐवजी जाऊ शकतो जीव, धक्कादायक अहवाल
देशभरात औषध माफियांचं रॅकेट, औषध विकत घेताना काय काळजी घ्याल? वाचा
Bogus Drug Racket : कोणत्या ना कोणत्या आजारामुळे प्रत्येकजण बाजारातून औषधं घेतो. मात्र बाजारात बोगस औषधांचा अक्षरश: सुळसुळाट झालाय. कोरोनाकाळात सर्वच व्यवसाय मंदीत होते. केवळ औषध निर्मीती व्यवसाय तेजीत होता. याचाच फायदा घेत औषध माफियांनी नकली औषधं बनवण्याचा आणि विक्रीचा गोरखधंदा मांडला.
सध्याच्या घडीला देशात तब्बल 47 टक्के औषधं बोगस असल्याची माहिती ASPA नावाच्या संस्थेच्या अहवालातून समोर आलीय. पाहूयात ASPAच्या अहवालात नेमकं काय म्हंटलंय.
तुमची औषधं बोगस? ASPAचा अहवाल
2021मध्ये नकली औषधांत 47%वाढ झाल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. यात लस, सॅनिटायझर, अँटिबायोटिक्सचा समावेश आहे. तब्बल 23 राज्यांमध्ये नकली औषधं सापडली असून ब्रांडेड औषधांच्या नावाने नकली औषधं बाजारात आल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
ही औषधं आरोग्यासाठी अपायकारक आहेत. या औषधांमुळे आजार बरा होण्याऐवजी रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे औषधं घेताना काळजी घेणं आवश्यक आहे.
औषध घेताना काय काळजी घ्याल?
औषधं पूर्ण पॅकिंगसहित विकत घ्या, माहितीतल्या ब्रँडची औषधं खरेदी करा, औषधाच्या नावाचा रंग, फाँट, अक्षरे तपासा, कंपनीचा लोगो, ट्रेडमार्क, होलोग्राम पडताळून घ्या. बारकोड किंवा क्युआरकोड स्कॅन करा आणि माहिती घ्या असं आवाहन डॉक्टर करतायत.
पैशांसाठी माफिया काय करतील याचा नेम नाही. आता त्यांनी थेट औषधांचाच काळाबाजार सुरू केलाय. लोकांच्या जिवाशी खेळणा-या या नराधमांवर कडक कारवाई व्हायलाच हवी. नाहीतर या असली नकलीच्या खेळात शेकडो निरपराधांचा बळी जाईल.