आसाम, बिहारमधील पूरग्रस्तांसाठी यूट्यूबर CarryMinatiचं मोठं योगदान
आसाम, बिहारमधील पूरग्रस्तांसाठी यूट्यूबर CarryMinatiचा `हा` स्तुत्य निर्णय
नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर CarryMinatiने आसाम, बिहारमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्तुत्य निर्णय घेत मोठं योगदान दिलं आहे. CarryMinatiचं खरं नाव अजय नागर आहे. अजयने एका ऑनलाईन चॅरिटी स्ट्रिमद्वारे आसाम आणि बिहारसाठी सुरु केलेल्या फंडद्वारे 10.31 लाख रुपये जमवले आहेत. या फंडमध्ये त्याने स्वत: 1 लाख रुपयांची मदत केली आहे. या फंडद्वारे जमा झालेली रक्कम आसाम आणि बिहारच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये अर्धी-अर्धी पाठवण्यात येणार आहेत.
या ऑनलाईन स्ट्रिमद्वारे सुरु करण्यात आलेल्या चॅरिटीमध्ये ज्या-ज्या लोकांनी मदत केली आहे, त्या सर्वांचे अजय अर्थात CarryMinatiने ट्विट करत आभार मानले आहेत. या चॅरिटीद्वारे 10,31,137 रुपये जमा झाले असून, मी आणखी 1 लाख रुपयांची मदत करत असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
CarryMinatiने रविवारी चॅरिटी स्ट्रिम सुरु केली होती. जी यूट्यूबवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाईव्ह सुरु होती.
CarryMinatiने सांगितलं की, 'कंटेंट बनवणं नेहमीच केवळ व्यावसायिक फायद्यासाठीच असू शकत नाही. नेहमीच समाजाला कोणत्या ना कोणत्या रुपात परतफेड करण्याची गरज असते. मी नेहमीच कोणत्याही प्रसिद्धीविना विविध सामाजिक कार्यांसाठी नेहमी मदत केली आहे आणि यापुढेही करत राहीन. कारण मला असा विश्वास आहे की, वाईट काळात प्रत्येकाने एकमेकांची साथ देणं महत्वाचं आहे. मानवतेला अजूनही प्रेम आणि आदराची, सन्मानाची गरज आहे, चांगल्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन मदत करण्याची गरज आहे.'
यापूर्वीही CarryMinatiने 2018 साली केरळमध्ये आलेला पूर, आसाम-बिहार पूर, 2019 मधील फानी चक्रीवादळ तसंच ऑस्ट्रेलिया बुशफायरमध्येही मदत केली होती.