युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. अतिशय अभ्यासपूर्वक आणि जठील विषयावर विश्लेषण करणारे त्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर एकीकडे त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला असताना, दुसरीकडे टीकाकारही वाढले आहेत. यामुळेच त्याच्याबद्दल काही अफवा व्हायरल होत असतात. दरम्यान अशीच एक अफवा सध्या व्हायरल झाली असून, थेट ध्रुव राठीनेच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याचं कारण यामध्ये त्याच्या कुटुंबाला खेचण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ध्रुव राठी याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा आहे. इतकंच नाही तर हे जोडपं कराचीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहत अशून, त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून सुरक्षा पुरवली जात असल्याचाही दावा आहे.  


ध्रुव राठीचे सोशल मीडियावर 18 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. आपल्या सरकारविरोधी व्हिडीओंसाठी तो ओळखला जातो. व्हिडीओतून तो नेहमीच सरकारची धोरणं, निर्णय यावर विश्लेषण करत आहे, अलीकडेच ध्रुव राठीला लक्ष्य करणाऱ्या अनेक पोस्ट समोर येत आहेत. यामधील एका पोस्टमध्ये ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 



ध्रुव राठीने या दाव्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने हा खोटा दावा असल्याचं स्पष्ट केलं आहे. माझ्या पत्नीच्या कुटुंबाला यामध्ये का खेचलं जात आहे? अशी विचारणाही त्याने केली आली आहे. ध्रुव राठीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी केलेल्या व्हिडीओंवर त्यांच्याकडे काहीच उत्तर नसल्याने असे खोटे दावे करत अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या पत्नीच्या कुटुंबाला यात ओढण्यासाठी तुम्ही किती हताश आहेस? या आयटी सेल कर्मचाऱ्यांचा घृणास्पद नैतिक दर्जाही तुम्ही पाहू शकता,” असा संताप ध्रुव राठीने व्यक्त केला आहे. 


ध्रुव राठी प्रसिद्ध युट्यूबर आहे. मागील काही वर्षात त्याचे सरकारची धोरणं, सामाजिक विषय यावरील व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. ध्रुव राठी केंद्र सरकारविरोधात टीका करत असल्याने त्याला होणारा विरोधही तितकाच आहे.