नवी दिल्ली - राजस्थानमधील अलवार येथील काँग्रेसच्या जाहीर सभेत काही जणांकडून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या संदर्भात 'झी न्यूज'ने काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि करण सिंग यादव यांचीही नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या काळात भारतविरोधी शक्तींकडून पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याचे तक्रारीमध्ये म्हणण्यात आले आहे.


या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि काँग्रेस पक्षातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, असे सुद्धा तक्रारीत म्हटले आहे. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात येत असल्याचे 'फेसबुक लाईव्ह' व्हिडिओचे फुटेज असलेल्या सीडी त्याचबरोबर इतरही प्रत्यक्षदर्शींनी चित्रित केलेल्या व्हिडिओंचे फुटेज असलेल्या सीडी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. 



अलवारमध्ये काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे समोर आल्यानंतर 'झी न्यूज'ने याआधीच काँग्रेस पक्ष आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. सिद्धू यांच्या जाहीर सभेतच ही घटना घडली होती. 'झी न्यूज'ने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर सिद्धू आणि काँग्रेस पक्षाने संबंधित व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर 'झी न्यूज' विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशाराही दिला होता.


काँग्रेसच्या काही नेत्यांकडून तर संबंधित व्हिडिओतील घोषणा देतानाची दृश्ये काढून टाकण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने एडिटिंग केलेले व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले होते.
सिद्धू यांच्या जाहीर सभेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या नसल्याचे रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले होते. यावेळी लोकांनी 'सत श्री अकाल' अशा घोषणा दिल्या होत्या, असे ट्विट त्यांनी केले होते. दरम्यान, 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी सुर्जेवाला यांचा दावा फेटाळून लावला. काँग्रेसकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्यानंतरचे फुटेज दाखवण्यात आले आहे, हे दाखवून देण्यात आले आहे.


पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्याचा व्हिडिओ वेगाने वेगवेगळ्या ठिकाणी शेअर झाला होता. पाकिस्तानमध्येही काही वृत्त वाहिन्यांवर याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते.