मुंबई : आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा नवी आव्हानं आणि नव्या संधी आपल्यासमोर घेऊन येतो. अनेकदा यामध्ये बऱ्याच गोष्टी अशाही घडतात ज्यांची अपेक्षाही केलेली नसते. मुळात याच संधी आयुष्याला कलाटणी देऊन जातत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सुवर्णसंधी लाभलेल्या छायाचित्रकाराची चर्चा होत आहे. त्यामागचं कारण पाहता चर्चा तर होणारच असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक, मँगलोर येथील हा छायाचित्रकार त्याच्या कलेमुळे अनेकांच्या नजरेत होताच. पण, त्याच्या कारकिर्दीत मिळालेल्या एका संधीने त्याला खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी होणाचं सुख मिळालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, त्याला अनपेक्षितपणे संधी मिळाली ती म्हणजे देशाचं लक्ष लागून राहिलेल्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या संपूर्ण लग्नसोहळ्याची क्षणचित्रे टीपण्याची. एक डिसेंबरपासून सुरू झालेल्या या विवाहसोहळ्यातील प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत ४७ वर्षीय विवेक सिक्वेरिया आणि त्याच्या १७ सहकाऱ्यांच्या टीमने जवळपास १.२ लाख क्षणचित्रं टीपत हा सोहळा कायमस्वरुपी अंबानी कुटुंबीच्या आठवणींच्या ठेव्यात सोपवला. 


'द न्यूज मिनिट'ला दिलेल्या मुलाखतीत विवेकने त्याचा हा अविस्मरणीय अनुभव सांगितला. 'माझ्या कारकिर्दीत आतापर्यंतचा हा सर्वाधिक भव्य विवाहसोहळा होता. सोबतच माझ्यासाठी तर हे एक स्वप्नच होतं', असं तो म्हणाला. 'आपल्यापुढे ज्यावेळी या समारंभाची क्षणचित्रे टीपण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, तेव्हा पुसटशी कल्पनाही नव्हती की हे नेमकं कोणाचं लग्न आहे', असं मोठ्या उत्साहात सांगत, 'जिंदगी बन जाएगी....' असंच फक्त त्याला सांगण्यात आलं होतं ही बाब त्याने अधोरेखित केली. 


खरंच... विवेकच्या आयुष्याला कलाटणी देणारीच ही संधी होती.  'मला हे लग्न कोणाचं आहे ते काहीच सांगण्यात आलं नव्हतं. फक्त १ ते १५ डिसेंबरसाठी माझा वेळ घेण्यात आला होता, काय आणि कशा प्रकारचे फोटो हवे आहेत हे माल सांगण्यात आलं होतं. मी हा प्रस्ताव स्वीकारला पम, तरीही लग्न कोणाचं आहे ते मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं होतं', असं विवेकने सांगितलं. आपल्याल्यासाठी ही एक अविश्वसनीय गोष्ट असल्याचच तो आताही म्हणतो. 


छाया सौजन्य- फेसबुक 

बरेच करार, गोपनीयतेची कागदपत्र आणि प्रक्रिया पार पाडत विवेक आणि त्याच्या टीमने देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या म्हणजेच मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सुवर्णसंधीमुळे विवेकचा जिंदगी बन जाएगी... या एका ओळीचा प्रत्यत आला असंच म्हणावं लागेल.