महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा नावाजलेल्या कंपनीचा निर्णय
दैनंदिन जीवनातही या कंपनीबाबत बरीत चर्चा असते....
मुंबई : मासिक पाळीच्या काळात महिलांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे महिलांवर या काळात परिणाम होत असतात. किंबहुना या काळाच महिलांना काही चढ- उतारांनाही सामोरं जावं लागतं. अशाच या काळात महिलांनी खरंतर आराम करणं अपेक्षित असतं, पण काही कारणास्तव म्हणा किंवा नाईलाजानं ते शक्य होत नाही.
वास्तविकता काही वेगळंच सांगत असताना आता मात्र त्यावर मार्ग काढत एका प्रसिद्ध भारतीय कंपनीनं मासिक पाळीच्या काळात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वर्षभरात दहा सुट्ट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कंपनी म्हणजे खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणारी Zomato.
भारतामध्ये मासिक पाळीबाबत असणारे न्यूनगंड आणि एकंदरच परिस्थिती पाहता कंपनी या निर्णयावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. 'मासिक पाळीदरम्यान सुट्टी मागण्यास कोणताही संकोचलेपणा किंवा लाज नसली पाहिजे', असं झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाल्याचं कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. तुमही मासिक पाळीसाठी सुट्टी घेतल्याचं अंतर्गत विभागांमध्ये काम करणाऱ्यांना सांगण्यात हरकत नसल्याचं मत त्यांनी येथे मांडलं होतं.
जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांच्या बळारव Zomato कडे देशातील लोकप्रिय कंपनी म्हणूनही पाहिलं जातं. कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी या कंपनीची विशेष ओळख आहे. त्यांच्या या निर्णयाविषयी म्हणावं तर, सर्वच स्तरांतून त्याबद्दल चर्चा सुरु असून, निर्णय़ाचं स्वागत होत आहे. शिवाय इतर कंपन्यांनीही असा निर्णय़ घ्यावा अशी मागणी काही स्तरांतून केली जात आहे.