मुंबई : 'बाप' या दोन शब्दातच त्याची जबाबदारी अधोरेखित होते. रक्ताचं पाणी करून मुलांचं पालनपोषण करणारा बाप माणूस मुलांना नकोसा झाला आहे. या बाप माणसासाठी आता घराचे दरवाजे बंद झाले आहेत, आणि वृद्धाश्रमाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. एका पाहणीत २९ टक्के कुटुंबांना वृद्ध नागरिक नकोसे झाले आहेत. रविवारी जगभरात 'फादर्स डे' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण 'फादर्स डे' साजरा करताना एक कटू सत्य समोर आले आहे. 'फादर्स डे'चे डीपी ठेवणाऱ्या २९ टक्के शहरी कुटुंबांना ज्येष्ठ नागरिक नकोसे झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हेल्पेज इंडिया' या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादाक तथ्यं समोर आले आहेत. २९ टक्के लोकांना म्हातारे आई-बाबा ओझं वाटतात. २५ टक्के लोक आई-वडिलांवर राग काढतात. ३५ टक्के लोकांना आई-वडिलांच सांभाळ करताना आनंद वाटत नाही. तर ६८ टक्के सुना सासू-सासऱ्यांच्या देखभालीचं काम नोकरांवर टाकतात. हे धक्कादायक तथ्यं पाहिल्यावर घरात 'बाप माणूस' नकोसा झाल्याचे अधोरेखित झाले आहे.


वडिलधारी माणसं कमवती असतात तोपर्यंत ते हवे असतात, पण त्यांच्या देखभालाची जबाबदारी मुलांवर पडते तेव्हा ते नकोसे होतात. आजकालच्या काळात वडिलधाऱ्या व्यक्तींना घरात समान वागणूक मिळत नाही. असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या योजना घरत यांनी केले आहे. 


ज्येष्ठ नागरिक हा कुटुंबाचा आधार असतो. त्यानं अनेक उन्हाळे- पावसाळे पाहिलेले असतात. हाच आधारवड कुटुंबाला नकोसा झालाय. जर घराच्या आधारवडाची रवानगी वृद्धाश्रमात केली जात असेल तर कुटुंबव्यवस्था कशी मजबूत राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.