IPL Rohit Sharma: 16 वर्षांच्या IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रोहित शर्माबरोबर `असं` घडलं
Rohit Sharma Hits New Low: मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्धचा वानखेडेच्या मैदानातील सामना मोठ्या फरकाने जिंकला असला तरी रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मात्र या अपयशाबरोबरच त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे.
Rohit Sharma Hits New Low: इंडियन प्रिमिअर लिगच्या 54 व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने घरच्या मैदानावर बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सला (MI Beats RCB) धूळ चारली. दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 200 धावांचं लक्ष्य सहज पार करत पॉइण्ट्स टेबलमध्येही मोठी झेप घेतली. मात्र या सामन्यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा अपयशी ठरला. एकीकडे मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तर कर्णधार रोहितच्या फॉर्मसंदर्भातील चिंता कायम आहे. या सामन्यामध्ये रोहित अवघ्या 7 धावांवर बाद झाला. मात्र या अपयशामुळे एक नकोशी गोष्ट पहिल्यांदाच रोहितबरोबर घडली आहे.
रिव्ह्यू घेतला आणि रोहित बाद झाला
200 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरलेल्या रोहितकडून संघाला फार अपेक्षा होता. मात्र रोहित शर्मा सामन्यातील 5 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरच तंबूत परतला. लेग साईडला फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा पायचित झाला. आधी पंचांनी रोहितला नॉट आऊट दिलं होतं. मात्र आरसीबीने रिव्ह्यूचा वापर केला असता रोहित बाद असल्याचं लक्षात आल्यानंतर रोहितला तंबूत परतावं लागलं. 7 धावांवर रोहित तंबूत परतण्याची मागील 5 सामन्यांमधील ही पाचवी वेळ आहे.
नकोशी कामगिरी...
पहिल्यांदाच रोहित शर्मा आयपीएलमधील सलगच्या 5 सामन्यांमध्ये 10 धावांच्या आत म्हणजेच एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे या 5 पैकी 2 डावांमध्ये रोहित शर्माला साधा भोपळाही फोटडा आला नाही आरसीबीविरुद्धच्या सामन्याआधी रोहित 8 चेंडूंमध्ये 2 धावा, 5 चेंडूंमध्ये 3 धावा, 3 चेंडूंमध्ये शून्य धावा, 3 चेंडूंमध्ये शून्य धावांवर बाद झाला आहे. इतक्या वाईट फॉर्ममध्ये रोहित यापूर्वी कधीच नव्हता. रोहित 2008 पासून आयपीएल खेळत असून सलग 5 सामन्यांमध्ये तो कधीच एकेरी धावसंख्येवर बाद झाला नव्हता.
रोहितची चिंता
फॅप ड्युप्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेलने 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करत आरसीबीचा धावफलक 199 पर्यंत नेला. या दोघांनी अवघ्या 62 चेंडूंमध्ये 120 धावा कुटल्या. विराट कोहली एका धावेवर तर अनुज रावत 6 धावांवर बाद झाल्यानंतर या दोघांनी डाव संभाळला. मुंबईला ईशान किशनने चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि निहाल वधेरा या दोघांनी मुंबई इंडियन्सचा विजय सुखकर केला. या विजयासहीत मुंबई इंडियन्सने पॉइण्ट टेबलमध्ये 12 गुणांसहीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. असं असलं तरी रोहितचा खराब फॉर्म हा मुंबईच्या चाहत्यांबरोबरच टीम मॅनेजमेंटसाठीही टेन्शनचा विषय ठरत आहे.