महाराष्ट्राच्या पुरातत्व वैभवात भर! आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे.
उमेश परब, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे.
मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य 12 अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच 20 फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते.
येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला ''वेताळ'' म्हणुन ओळखतात.
याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत. या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ''पांडवांची चित्रे'' नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत.
या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व 20 ते 10 हजार वर्षे) या काळात झाली असावी. या काळात मानव हा भटका शिकारी अवस्थेत होता. त्याला पशुपालन व शेतीचे ज्ञान नव्हते.
कातळशिल्पे म्हणजे नेमके काय, त्यांचा कालावधी, ती कोरण्याचे उद्देश याबाबत संशोधन होण्याची गरज असून ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही नक्कीच भुषणावह आहे.या कातळशिल्पांचे जतन करणे हे ही तितकेच महत्वाचे असून यासाठी शासन दरबार गंभीर होणं गरजेचं आहे.