वाशीतील रघुलीला मॉलचे छत कोसळले

पीओपीच्या छतासोबत अॅल्युमिनियमचा सांगाडाही खाली कोसळला.
नवी मुंबई: वाशी रेल्वे स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या रघुलीला मॉलचे छत मंगळवारी दुपारी कोसळले. या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. रघुलीला मॉलचे हे छत पीओपीचे होते. पावसात भिजल्यामुळे छत कमकुवत झाले होते. त्यामुळे ते कोसळले, असे मॉल प्रशासनाकडून सांगण्यात आले. पीओपीच्या छतासोबत अॅल्युमिनियमचा सांगाडाही खाली कोसळला.
यामुळे मॉलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते. या दुर्घटनेनंतर काही वेळासाठी मॉल बंद करण्यात आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी छताची पहाणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर संध्याकाळी हा मॉल खुला करण्यात आला.