सिंधुदुर्ग: देवगडमध्ये सध्या बहुतांशी आंबा बागा मोहरांनी फुलून गेल्यात. मात्र, यामुळे आंबा बागायतदार आणि  व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आंबा व्यवसाय क्षेत्रातील बागायतदारांच्या मते सध्या आलेला मोहोर हा अत्यंत धोकादायक आहे. मुळात या काळात इतक्या प्रचंड प्रमाणात हापूसची कलमे मोहरावीत हेच जणू आश्चर्यकारक आहे. ऑगस्ट महिन्यात एखादे असे कलम मोहरते. मात्र, आता सर्वत्र बागा मोहरांनी फुललेल्या दिसतात. हापूसच्या हार्मोन्समधील बदलामुळे ही प्रक्रिया झाल्याचे दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खारे वारे आणि वातावरणात झालेले बदल यामुळे हा मोहोर आला आहे.  खरं तर, मोठ्या प्रमाणात आलेला मोहोर टिकवायचा झाल्यास आंबा उत्पादक शेतकऱ्याला अवघड जाते. कारण येणाऱ्या खर्चाचा आणि उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही. 


ज्या शेतकऱ्यांना हा मोहोर टिकवायचा असेल त्यांना दोन ते चार दिवसानी बुरशीनाशक फवारणी करावी लागते. त्यामुळे आलेल्या मोहोरापैकी २५ टक्के मोहोर टिकतो. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाऊस गेल्याने आंब्यावर ताण पडून हा मोहोर मोठ्या प्रमाणात आला. 


काही प्रगतशील शेतकरी हा मोहर टिकविण्यासाठी प्रयत्न करतायत. अरविंद वाळके यांच्या आंबा बागेत चारशे ते पाचशे आंब्याच्या कलमाना 'फूट' आलीय. मात्र एवढ्या कलमांना प्रयोग करणे शक्य नसल्याने चार ते पाच कलमावर प्रकिया करणार आहेत.