मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख घरात इंटरनेट कनेक्शन तसंच मोफत सेटटॉप बॉक्स देण्यासंदर्भात बीएसएनएस आणि स्पेक्ट्रम या कंपन्यांमध्ये करार झाला. त्यामुळे आता सरकारी कंपनी बीएसएनएल आणि सरकारच्या माध्यमातून ही इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, काही खासगी कंपनीला सरकारी विभाग सहकार्य करीत असल्याचा आरोप करत, खासगीकरणाची खाज कधी संपेल, असा थेट हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. सरकारी विभाग मोडकळीस आणून खासगी कंपन्यांना वाव दिला जातो, असा आरोप उद्धव यांनी केला. तसेच खासगीकरणाची खाज कधी संपेल माहिती नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंनी रिलायन्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला.


ग्रामीण भागातील घरे इंटरनेटने जोडला जाणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. यामाध्यमातून कोकणात होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे कोकणवासींयाचे जीवन उजळून निघेल, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ई एज्युकेशन व स्पर्धा परीक्षेचे धडे मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी व मोफत सेट टॉप बॉक्स देण्यासंबंधी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि स्ट्रीम कॉस्ट कंपनी यांच्यात हा करार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.