`ये आडवा, तुला गाडूनच...`, ठाकरेंचं राणेंना चॅलेंज; म्हणाले, `लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा..`
Uddhav Thackeray On Narayan Rane: कणकवलीमधील सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारायण राणेंनी कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण देऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरेंना दिलं होतं.
Uddhav Thackeray On Narayan Rane: ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कणकवलीमध्ये शुक्रवारी सायंकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेमधून त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला नेणार असाल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी या सभेतून दिला. या वेळेस भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी खास आपल्या शैलीत नारायण राणेंनी दिलेल्या आव्हानावरुन भाष्य करत तुफान फटकेबाजी केली.
नाराणय राणेंनी दिलेलं आव्हान...
कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण करुन दाखवा असं आव्हान नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये नारायण राणेंचा समाचार घेतला. "कुणीतरी मला धमकी दिली. आपल्याकडे मराठीत काही म्हणी आहेत. त्यापैकी एक म्हण अशी आहे की शुभ बोल रे नाऱ्या. मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो. मी येऊन उभा आहे. परत कसे जातात बघतो. तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. आडवा येच तू," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. "लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात येऊन उभा राहिला तिकडे तुला साफ करुन टाकला. लाज नाही, लज्जा नाही. उगाच आपला बडबडतोय. म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या. आता या म्हणतील नाव मी ठेवलेलं नाही," असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
बाळासाहेब गेट आऊट म्हणालेली व्यक्ती भाजपाचा उमेदवार
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची कचऱ्याशी तुलना करत उद्धव यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारायण राणेंना बाळासाहेब गेट आऊट म्हणाले होते. तोच उमेदवार इथून भाजपाने दिल्याचा टोला ठाकरेंनी लगावला. "मोदी देशाचे प्रश्न विसरुन गेले आहेत. मग काँग्रेस काय करणार, ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार. आहो राजकारणात तुम्हाला मुलं नाही होत मग आम्ही काय करणार? आमचा काय दोष आहे? आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागत आहेत. ते करताना भाजपाचं काय झालंय की, कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात, आता निवडणुकीमध्ये कचऱ्याचं प्रदर्शन लावलं आहे. सगळा कचरा. ज्याला बाळासाहेबांनी गेट आऊट म्हटलं तो आज तुमचा उमेदवार आहे. हीच मस्ती होती त्या वेळेला. तुला बघून घेतो. तुझं अमुक करुन घेतो. अरे काय घेतोस तू? जा काय करायचं ते कर म्हणत गेट आऊट म्हणाले होते.
तुम्हाला हिंमत नव्हती तेव्हा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारी ठाकरेंवर मुस्लीम मतपेटीचे राजाकरण करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचा उल्लेख 'बेअकली जनता पार्टी' असा करत टोला लगावला. राम मंदिराबाबत बोलण्याची तुम्हाला हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला. आम्ही राम मंदिराला पाठिंबा दिला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.