`उद्योगमंत्री असून साधे रोजगार मेळावे घेत नाहीत`; उदय सामंतांवर संतापले शिवसैनिक
Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याविषयी पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री असून जिल्ह्यात रोजगार मेळावा घेत नाही असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीच्या खेड तालुक्यात हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेसच्या प्रस्तावित नवीन ग्रीनफिल्डचे भूमिपूजन केले. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि एचसीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन पाब्लो रॉड्रिग्ज आणि इतरांच्या उपस्थितीत मुख्यंमंत्री शिंदे यांनी हे भूमिपूजन केले होते. कोकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल, असा विश्वास यावेळई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत रायगडचे (Raigad) शिवसैनिक नाराज असल्याचे समोर आलं आहे.
राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना रायगडच्या शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिलाय. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केलीय. उदय सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री आहेत पण जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. इथं अनेक उद्योग आहेत परंतु साधा रोजगार मेळावा घेतला नाही. पालकमंत्री असून देखील जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी ते कुठलेच प्रयत्न करत नाही. शिवसैनिकाशी संवाद साधत नसल्याचा आरोप शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे.
रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी शिवसैनिकांची खंत बोलून दाखवली. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी राजा केणी यांची री ओढली. निरीक्षक मंगेश सातामकर यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्याबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली.
"बेरोजगारीचा प्रश्न न सुटणारा आहे. आपण महाराष्ट्राच्या सत्तेत सामील आहोत. उदय सामंत रायगडचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री आहेत. जिल्ह्यात कुठेतरी रोजगार मेळावा घ्यायला पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आहेत. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पालकमंत्री उदय सामंत कधी येतात, कधी जातात. पण संघटना वाढीसाठी त्यांनी कधी कार्यकर्त्यांची बैठक घेतली नाही. जेव्हा आम्ही एखाद्या कार्यकर्त्यासाठी कंपनीमध्ये काम पाहण्यासाठी जातो तेव्हा आम्हाला विश्वासत घेतलं जात नाही," अशी खंत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केली.