मुंबई: राजधानी मुंबई आणि उपनगर परिसरात पावसानं रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. पश्चिम उपनगरातील लोअर परळ, एलफिन्स्टन, दादर, माटुंगा, माहीम, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, मालाडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पूर्व उपनगरातील सायन, घाटकोपर, विक्रोळी या परिसरातही धो-धो पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. घाटकोपरमध्ये काही भागात गुडघाभर पाणी साचलंय. येत्या ४ दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांनो पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा. 


पालघरमध्ये धो-धो कोसळून विश्रांती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस रात्रभर सुरु होता. सूर्या प्रकल्पच्या धरण क्षेत्रातही चांगला पाउस झाला. वसई विरार महानगर पालिका आणि पालघर जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणारे तसेच, जिल्ह्यातील पाणी साठवणीची मोठी क्षमता असलेले धामनी धरणाची पाणी पातळी ११०.१५ मीटर पर्यन्त पोचली आहे. धरण ५८.५% भरले आहे. त्यामुळे १६०.८० द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. धरण क्षेत्रात १४७ मीमी पावसाची नोंद झाली. सध्या कवडास धरण पूर्ण भरल असून सूर्या नदी द्वारे ६००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सूर्या, वैतरना, पिंजाळ, देहर्जे या नदयांना पूर आला आहे. दरम्यान, पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे.


वसईत २४ तासात १८१ मीमी पावसाचीं नोंद


वसईत  गेल्या २४ तासात १८१ मीमी पावसाचीं नोंद झाली आहें. आज पहाटे पासून पावसाची संततधार सुरुच आहे. पाऊस अखंडपणे न कोसळता काहीसी विश्रांती घेत कोसळत असल्याने  कुठेही पाणी साचले नाही.


नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा सज्ज


हवामान खात्याने जिल्ह्यात येत्या २४ तासात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला असला तरी, आता रायगड जिल्‍हयातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्‍यामुळे सावित्री, गांधारी, अंबा, गाढी, काळ नद्यांची पाणीपातळी खाली गेलीय. त्‍यामुळे रायगडकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडलाय. शनिवारी महाड, नागोठणे भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. पाऊस थांबल्‍याने पूराचे पाणी ओसरले असून जनजीवन पूर्वपदावर आलंय. सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाने उघडीप घेतलीय. अधूनमधून रिमझिम ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या  सरी बरसत आहेत . पाऊस थांबला असला तरी वातावरण ढगाळ आहे. दरम्‍यान पावसाची शक्‍यता लक्षात घेवून रायगड जिल्‍हा प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सर्व  यंत्रणांना सज्‍ज राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍यात.