कळंबोलीतील परिस्थिती नियंत्रणात, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्वपदावर
या आंदोलकांना हटविण्यासाठी गेले असता त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली.
नवी मुंबई: सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने बुधवारी दुपारी बंद आंदोनल मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही अजूनही नवी मुंबईतील तणाव निवळलेला नाही. सध्या पोलिसांनी येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरु केली आहे. मात्र, अजूनही आंदोलक या परिसरात असल्याने पोलीस सतर्क आहेत. समन्वय समितीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा करुनही कळंबोली आणि कोपरखैरणे येथील मराठा आंदोलक काही केल्या माघार घ्यायला तयार नव्हते.
कळंबोलीत आंदोलकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. तर कोपरखैरणेमध्ये आंदोलकांनी पोलीस चौकी जाळल्याची घटना घडली. या सगळ्या परिस्थितीमुळे नवी मुंबईत प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, या आंदोलनात काही अपिरिचित चेहऱ्यांनी घुसखोरी केल्याचा संशय माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. आंदोलनासंबंधींच्या बैठकांना हे लोक उपस्थित नव्हते. मात्र, आज अचानकपणे रस्त्यावर हे अपरिचित चेहरे दिसून आले. या लोकांकडून हिंसक पद्धतीने आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न झाल्याचीही शंका त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने आंदोलन मागे घेतल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनाही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मात्र, त्यानंतरही ठाण्यात नितीन कंपनीजवळ आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरीच वाहतूक सुरळीत करायला गेलेल्या पोलिसांना आंदोलकांच्या तुफान दगडफेकीला सामोरे जावे लागले.
यामुळे पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. मात्र, इतके करुनही आंदोलक मागे हटायला तयार नाहीत.