न्यायालयाचा दिलासा अन नितेश राणे प्रकटले...
इतके दिवस होते कुठे?
सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. यादरम्यान नितेश राणे यांना अटक करणार नाही असे कणकवली पोलिसांनी न्यायालयात सांगितल्यानंतर आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले.
संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून आतापर्यत तीन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या काळात राणे नॉटरिचेबल होते.
आज मुंबई उच्च न्यायालयात आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग हे या प्रकरणावर सोमवारी निकाल देणार आहेत. तोपर्यंत नितेश राणे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यापासून गेले १५ दिवस नॉटरिचेबल असलेले नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं.
शिवसेनेला धक्का देत भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँक काबीज केली. त्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. हे निमित्त साधत राणे यांनी जिल्हा बँकेत दाखल होत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केलं.