सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली. नितेश राणे यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी राणे यांची कोठडी वाढवून मागितली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धीरज जाधव व ज्ञानेश्वर माऊली या आरोपीना अटक करायची आहे. ज्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कट शिजला ती गाडी जप्त करायची आहे. यासाठी 8 दिवसाची पोलीस कोठडी हवी असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर, तपासात आम्ही सहकार्य केलं असा दावा राणे यांचे वकील ऍड. मानेशिंदे यांनी केला. 


न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून १८ फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


कणकवली पोलिसांकडून काल दिवसभर आमदार नितेश राणे यांची वेगेवगळया ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. काल सावंतवाडी पोलीस ठाण्यातून नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. कणवकवली पोलिसांनी साडेपाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना गोवा इथल्या नीलम बिट्स या हॉटेलमध्ये नेण्यात आलं, तिथेही त्यांची चौकशी करण्यात आली. या हॉटेलमध्येच संतोष परब हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.


तसंच नितेश राणे आणि त्यांचे पीए राकेश परब यांचीही समोरा-समोर चौकशी झाली. आज नितेश राणे यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ते जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात.


या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीतून आज सिंधुदुर्गात धाव घेतली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. असं असतानाही नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.


संतोष परब यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिवसैनिक संतोष परब यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश राणे यांना अटक झाल्याने मला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळाला आहे, असं संतोष परब यांनी म्हटलं आहे.