प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. २० एप्रिलला ही ट्रेन ओखावरून रवाना होईल आणि २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी, १ वाजून ४० मिनिटांनी कणकवली, ४ वाजून ५० मिनिटांनी मडगाव, तर ९ वाजून १० मिनिटांनी उड्डपी येथे पोहोचणार आहे. 



तर २४ एप्रिलला ही ट्रेन तिरुअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उड्डपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.



व्यापारी, उत्पादक आंबा बागायतदार या ट्रेन मधून आपल्या मालाचीने आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात याकरीता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 


कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोकण रेल्वेने पहिल्या दिवसापासून महत्वाची भूमिका बजावली आहे. पार्सल ट्रेनच्या निमित्ताने कोकण रेल्वेने छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि बागायतदारांना मदतीचा हात दिला आहे.