पार्टनरच्या आधीच्या जोडीदारावर सतत नजर ठेवणाऱ्यांनो सावधान! तुम्हाला झालाय `हा` आजार
What Is Rebecca Syndrome? It`s Symptoms And Cure: तुम्हालाही ही समस्या असू शकते. मात्र याची कल्पना तुम्हाला नही असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमकी ही समस्या काय आहे जाणून घेऊयात...
What Is Rebecca Syndrome? It's Symptoms And Cure: सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलं आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीबरोबर संवाद साधणं सहज सोपं झालं आहे. मात्र याच सोशल मीडियामुळे अगदी आपल्या थेट ओळखीत नसलेल्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते. मात्र या अनोखळी व्यक्तींच्या खासगी आयुष्यामध्ये डोकावण्याचा परिणाम आता लोकांच्या नातेसंबंधांवर होऊ लागला आहे. खास करुन आपल्या जोडीदाराच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकजण मुद्दाम त्यांच्या प्रोफाइल पाहतात. अनेकांना तर ही सवय असते.
तुम्हीही हे असं करता का?
आपल्या पूर्वाश्रमीच्या म्हणजे एक्स जोडीदाराच्या आयुष्यात काय चाललं आहे, त्याचं आणि आपल्या जोडीदाराचं नातं कसं होतं, आपल्या जोडीदाराचा एक्स सध्या काय करतोय हे सोशल मीडियावर पाहणं यासारख्या गोष्टी आता अनेकजण करत असल्याचं समोर आलं आहे. तुम्हालाही अशाप्रकारे तुमच्या जोडीदाराच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वारंवार वाटत असेल आणि तुम्ही त्यांचं अकाऊंट वारंवार चेक करत असाल तर तुम्ही एका मानसिक आजाराला बळी पडला आहात. या आजाराचं नाव आहे, रेबेका सिंड्रोम!
महिलांमध्ये प्राकर्षाने दिसून येते ही समस्या
लंडनमधील सेंटर फॉर फ्र्युडीएन अॅनलिसीस अॅण्ड रिसर्च या संस्थेचे संस्थापक सदस्य तसेच सायकोअॅनलिस्ट असलेल्या डॉक्टर डॅरेन लिडर यांनी 'रेबेका सिंड्रोम' हे नाव या मानसिक आजाराला दिलं आहे. अनेकदा दोघांमधील नातं उत्तम आणि निरोगी असतानाही पूर्वीच्या नात्यासंदर्भातील शंका मिठाचा खडा टाकू शकते. 'द इंडिपेंडण्ट'मध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, "महिलांमध्ये ही समस्या प्राकर्षाने दिसते. हे असं असतं की त्याच्या आयुष्यात आलेल्या आधीच्या महिलेकडे त्याची सध्याची जोडीदार वारंवार मानसिकदृष्ट्या आकर्षित होते. वारंवार आपल्या जोडीदाराच्या आधीच्या जोडीदाराबद्दल जाणून घेतल्यास महिलांना मानसिक समाधान मिळतं. यामुळेच पूर्वी एखादं रिलेशन असलेल्या व्यक्तीकडे महिला अधिक आकर्षिक होतात," असं या अहवालात म्हटलं आहे.
नक्क्की वाचा >> Silent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..; जाणून घ्या सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं
अशा व्यक्तींबरोबर नेमकं घडतं काय?
'रेबेका सिंड्रोम' हे नाव डॅफ्ने डु मॉरियर लिखित 'रेबेका' नावाच्या कांदबरीवरुन ठेवण्यात आलं आहे. मानसोपचारतज्ज्ञ लुईस गोडार्ड-क्रॉली यांनी न्यूजविकला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "ही परिस्थिती प्राथमिकपणे एखाद्या व्यक्तीला वाटणारी ईर्ष्या आणि त्याच्या जोडीदाराबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामुळे निर्माण होते. जोडादाराच्या आधीच्या नात्याबद्दल सतत विचार करत राहणे, संपुष्टात आलेल्या नात्याबद्दल इर्षा वाटत राहणे यासारख्या गोष्टी अशा व्यक्तींच्या डोक्यात सुरु असतात. अशी ईर्ष्या वाटण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसते," असं सांगितलं. जोडीदाराच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराबद्दल अतीविचार करणाऱ्या व्यक्ती भूतकाळात जगू लागतात. त्यामुळे या अशा व्यक्ती 'रेबेका सिंड्रोम'मध्ये गुंतत जातात.
'रेबेका सिंड्रोम' आहे असं वाटत असेल तर काय करावं?
आता तुम्हाला 'रेबेका सिंड्रोम' असेल तर काय करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे जोडीदाराच्या भूतकाळात फार रमू नका. भूतकाळात रमून राहिल्यात तुमचं सध्याचं नातं आणि भविष्यकाळ उद्धवस्त होऊ शकतो. तुमच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मनातील विचार संयम न गमावता आपल्या जोडीदाराला बोलून दाखवा. चर्चा केल्याने अनेक समस्या सुटू शकतात. तुम्ही तुमच्या फोनपासून आणि सोशल मीडियापासून दूर राहून प्रत्यक्षात जोडीदाराशी संवाद साधण्यास प्राधान्य द्या.