Children’s Day Speech in Marathi: भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. कारण देशभरातील लहान मुलांचे ते लाडके चाचा नेहरु होते. हा दिवस देशभरात आनंदात साजरा केला जातो. यावेळी शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी भाषण देतात. भाषणाची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरु होते. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास भाषण घेऊन आलो आहोत. हे भाषण दिल्यास टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदरणीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो,


आज आपण सर्वजण एका खास प्रसंगी एकत्र आलो आहोत. तो प्रसंग म्हणजे बालदिन. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी आपण हा दिवस साजरा करतो. मुलांचे हक्क, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवस समर्पित असतो. हा दिवस आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंची आठवण करून देतो. ज्यांना आपण सारेजण प्रेमाने 'चाचा नेहरू' म्हणतो. मुले हे देशाचे भविष्य आहेत, त्यांची स्वप्ने आपण साकार करू शकलो तर आपल्या देशाचे भविष्यही तितकेच उज्ज्वल होईल, असा विश्वास चाचा नेहरु यांनी व्यक्त केला होता.


प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस केवळ आपला सन्मान करण्यासाठी आहे. आपल्याला स्वतःबद्दल अभिमान वाटण्याचा आहे. एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्या जीवनाला आकार देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना आयुष्यात कधी ना कधी आव्हानांचा सामना करावा लागतोच. 'बालपण हा असा काळ असतो जेव्हा आपण खुल्या आकाशात पंख पसरण्याची स्वप्ने पाहू शकतो.', असे चाचा नेहरु म्हणायचे. त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांना कधीही लहान समजू नये. आणि नेहमी कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे.


आदरणीय शिक्षकांनो, तुमचे आम्हा विद्यार्थ्यांप्रती असलेल्या योगदानामुळेच हा दिवस खास बनतो. मुलांना शिकवणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य दिशा दाखवणे हे तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे. आम्हा मुलांच्या छोट्या डोळ्यांमध्ये तुम्ही जो आत्मविश्वास निर्माण करता तो आमच्यासाठी जीवनातील उंची गाठण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाया बनतो. तुमच्या मेहनतीशिवाय आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही.


म्हणून या बालदिनानिमित्त आपण सर्वांनी अशी शपथ घेऊया की, आम्ही आमची स्वप्ने कधीही मरू देणार नाही आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करू.


काय लक्षात ठेवाल?


'आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो' याने भाषणाची सुरुवात अशी करा. यानंतर सर्वांना बालदिन 2024 च्या शुभेच्छा द्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त, आपण सर्वांनी आपल्या लाडक्या पहिल्या पंतप्रधानांची आठवण काढूया. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारताच्या स्वातंत्र्यापासून ते स्वतंत्र भारताच्या विकासापर्यंत सर्वच बाबतीत पंडित नेहरूंचे योगदान आहे. हे श्रोत्यांना समजावून सांगा.


पंडित नेहरूंच्या मुलांबद्दलच्या विशेष प्रेमामुळे, ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते, म्हणून मुले त्यांना 'चाचा नेहरू' म्हणत असत. भाषण खूप लांब किंवा कंटाळवाणे होऊ नये याची काळजी घ्या.पंडित नेहरूंच्या भाषणातील एखादे उदाहरणदेखील द्या.


पंडितजी म्हणायचे, 'मुले बागेतील कळ्यांसारखी असतात ज्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. कारण तेच देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक आहेत.'


यानंतर तुमच्या भाषणात पंडित नेहरूंशी संबंधित काही रंजक गोष्टींचा समावेश करा.या मनोरंजक गोष्टी फक्त मुलांशी संबंधित असाव्यात हे लक्षात ठेवा. पंडित नेहरूंचे एक किंवा दोन प्रेरणादायी विचार सांगा. शेवट करताना, बालदिनानिमित्त आपणा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन असे म्हणत शेवटी, सर्वांचे आभार माना.