Steamed Modak Recipe: बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच खूप सारी तयारी करावी. लागते बाप्पाची आरास, मखर, सजावट यासाठी काही जण तर महिनाभर आधीच तयारी करतात. पण त्याचबरोबर बाप्पाचा नैवेद्यदेखील खास असतो. बाप्पाला प्रिय असणारा आणि महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक. राज्यातील विविध भागात उकडीचा मोदक बनवण्याची पाककृती वेगवेगळी असू शकते. बऱ्याचदा मोदक बनवताना अगदी छोट्याश्या चुका झाल्या तरी मोदक बिघडतो. अशावेळी या काही टिप्स लक्षात ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदक बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांदळाची पिठी. मोदक बनवण्यासाठी तुम्ही कोणता तांदुळ वापरता हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं. कारण कधी कधी योग्य तांदुळ न घेतल्यामुळंही मोदक बिघडतात. तसंच, उकड नीट झाली नाही तर मोदक बिघडतात. अशावेळी मोदकासाठीची तांदळाची पीठी कशी करावी आणि पीठ कसे करावे, याची आज आपण माहिती घेऊया. 


मोदकासाठी कोणता तांदूळ घ्यावा?


हल्ली बाजारात मोदकाचं पीठ विकत मिळतं. मात्र, तुम्ही घरातही तांदळाचं पीठ बनवू शकता. मात्र, त्यासाठी तांदुळ निवडताना तुम्हाला थोडी खबरदारी घ्यावी लागेल. कारण विकतच्या पीठापेक्षा घरी बनवलेले तांदळाचे पीठ अधिक चांगले असते. मोदकासाठीची पीठी बनवत असताना शक्यतो इंद्रायणी जुना वापरु शकता मात्र त्याचे मोदक थोडे चिकट होतात. आंबे मोहर हा तांदुळ सगळ्यात उत्तम आहे. या तांदळामुळं मोदक मऊसूत होतात. त्याचबरोबर मोदकाच्या पाऱ्याही चिरत नाहीत. थंड झाल्यानंतरही मोदक चांगले मऊसूत राहतात. तसंच, सुवासिक बासमतीदेखील वापरु शकता. मात्र या तांदळाचे मोदक थोडेसे चिरण्याची शक्यता असते. कारण तो तांदुळ थोडा कोरडा असतो. 


हा तांदुळ वापरु नये 


मोदकासाठीचे पिठी तयार करत असताना कोलम किंवा नवा तांदूळ घेऊ नये. 


मोदकाचे पीठ कसे तयार करावे?


मोदकाचे पीठ घरात करत असताना सर्वप्रथम तुम्ही कोणता तांदुळ घेताय ते महत्त्वाचे आहे. तादुंळ शक्यतो जुना असावा. सर्वप्रथम तांदुळ चांगला धुवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटे चाळणीवर निथळून घ्यायचा. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्या. रात्रभर तांदुळ चांगला सुकवून घ्या. तांदुळ चांगला सुकवलेला असावा. शक्यतो फॅनखाली तांदुळ सुकवून घ्या. उन्हात सुकवल्यास तो अधिक कोरडा होण्याची शक्यता असते. ज्यामुळं मोदक चिरण्याची शक्यता असते. तांदुळ चांगला सुकल्यानंतर तो दळायला द्यावा. शक्यतो घरघंटीतच तांदूळ दळून आणा.