Janmashtami Special Prasad Recipe: जन्माष्टमीला मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण साजरा होतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन असते. या दिवशी श्रीकृष्णाला दही - पोह्यांचा नैवेद्या दाखवला जातो. 


जन्माष्टमीला दही-पोहे खाण्याचे महत्त्व


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळकृष्णाच्या बाल लिला सगळ्यांनाच माहिती आहेत. लहानपणी श्रीकृष्ण भगवान गोकुळात शेजाऱ्यांच्या घरातून दूध, दही, लोण्याने भरलेले भांडे फोडत असत. तेव्हा त्याने सुख-समृध्दी येते असे मानले जात असे. दही - पोह्यांच्या या प्रसादाला काला असे ही म्हणतात. हा प्रसाद अनेक पदार्थ एकत्र कालवून, मिसळून केला जातो म्हणून त्याला काला म्हणतात. तसेच गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. म्हणून याला गोपाळकाला असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणार्थ हा गोपाळकाला प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो. 


असा तयार करा गोपाळकाला 


पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे गोपाळकाल्यातील प्रमुख घटक आहेत. गोपळकाला करणे तसे सोपे आहे फक्त त्यातील प्रत्येक पदार्थाचे प्रमाण व्यवस्थित पडले पाहिजे. 


साहित्य - 1 वाटी पोहे, अर्धी वाटी मुरमुरे, अर्धा वाटी ज्वारीच्या लाह्या, डाळिंब, पेरू, केळी, पपई आणि तुमची आवडती वाटीभर फळे, अर्धी वाटी दही, 1 चमचा भिजवलेली हरभरा डाळ, 1 चमचा तुप, चिमुटभर हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि चवी नुसार साखर, तिखट, मीठ.  


कृती
1. पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
2. लाह्या आणि मुरमुरे 5 मिनिटे पाण्यात भिजवून घ्या.
3. दह्यात चवी नुसार साखर आणि मीठ घाला. आणि दही नीट फेटून घ्या. 
4. आता फेटलेल्या दह्यात भिजवलेले पोहे, मुरमुरे, लाह्या, बारीक चिरलेली तुमच्या आवडीची फळे आणि चिरलेली कोथिंबीर घाला. 
5. आता कढईत तुप घालून जिरे, हिंग आणि मिरच्या घालून फोडणी करून गोपाळकाल्यात घाला.
6. तुम्ही त्यात चवी नुसार मीठ आणि गरज भासल्यास तिखट घालू शकता. मग हे सगळं मिश्रण एकदा नीट हलवून घ्या. आणि तुमचा गोपाळकाला तयार होईल.


दही-पोहे खाण्याचे फायदे


पोहे मुळात पचायला हलके असतात. त्यात कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) असतात, त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. दही खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच उष्णता कमी होते. आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. पोह्यातून मिळणाऱ्या लोहामुळे अशक्तपणा कमी होतो. एवढेच नाही तर वजन कमी करण्यासाठी ही पोहे आणि दही उत्तम पर्याय आहेत, कारण त्यात ग्लुटेन कमी असते. दह्याचे सेवन नियमित केल्याने पोटातील जळजळ थांबते. ऍसिडिटी आणि पोटाशी संबंधित इतर समस्याही कमी होतात. असा हा आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीष्ट गोपाळकाल तुम्हीही नक्की करून बघा.