जगातील सर्वात महागडा पदार्थ! 1 किलोची किंमत 50 किलो सोन्याइतकी; 5 Facts वाचून व्हाल थक्क
Most Expensive Food In The World: जगातील सर्वात महागडा पदार्थ अशी ओळख असलेला हा पदार्थ अनेक डिशमध्ये वापरला जातो. तुम्ही कधी या पदार्थाबद्दल ऐकलं किंवा वाचलं आहे का?
Most Expensive Food In The World: जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. अनेक देशांमध्ये शाकाहारी खाण्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र हल्ली दिसू लागलं आहे. अनेक देशांमध्ये मासे आणि समुद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून असलेल्याचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला जगातील सर्वात महागडा पदार्थ लाखो रुपयांना मिळतो असं सांगितलं तर नक्कीच विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जगातील सर्वात महागड्या पदार्थांची किंमत ही सोन्याहून 50 पट अधिक आहे. अल्मास कॅवियार (Almas Caviar) असं या पदार्थाचं नाव आहे. या खाद्यपदार्थाचा वापर अनेक डिशमध्ये केला जातो. या पदार्थाची नेमकी किंमत किती आणि आणि त्याच्या उपयोगाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
कॅवियार म्हणजे काय?
कॅवियार काय असतं हे आधी जाणून घेऊयात. सामान्यपणे लोक कॅवियारला माशांची अंडी आहेत, असं समजतात. मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. 'यूएस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार कॅवियार स्टर्जन माशाच्या अंडाशयामध्ये सापडणारी अंडी असतात. सगळ्या माशांच्या अंड्यांना कॅवियार म्हणत नाहीत. केवळ स्टर्जन माशांच्या अंड्यांनाच कॅवियार म्हणतात. कॅवियार चार वेगवेगळ्या प्रकारचं असतं. अल्मास, बेगुला, ओस्सिएटर आणि सेव्रुगा असे कॅवियारचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. या सर्व कॅवियारचा रंग आणि चव वेगवेगळे असतात. या सर्व कॅवियारची किंमतही फार वेगवेगळी असते. मात्र अल्मास कॅवियार हे सर्वात महागडं असतं.
एवढी किंमत असण्याचं कारण काय?
अल्मास कॅवियार हा जगातील सर्वात महागडा पदार्थ आहे. एक किलो अल्मास कॅवियारची किंमत 34 हजार 500 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार एक किलो अल्मास कॅवियारसाठी 28 लाख 74 हजार रुपये मोजावे लागतात. कॅवियारची किंमत अधिक असण्याचं कारण म्हणजे ते इराणी बेलुगा स्टर्जन माशापासून मिळवलं जातं. बेलुगा कॅवियारची किंमत 20 लाख रुपये प्रति किलो इतकी आहे. अल्मास कॅवियार केवळ अल्बिनो बेलुगा स्टर्न माशापासून मिळतं. या माशाचं वय 100 वर्षांहून अधिक असतं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या रिपोर्टनुसार, अल्मास बेलुगा स्टर्जन मासा हा इराणजवळच्या कॅस्पियन समुद्रात सर्वात स्वच्छ पाणी असलेल्या भागात आढळून येतो. ही फार दुर्मिळ प्रजाती आहे. अल्मास कॅवियार छोट्या मण्यांसारखं दिसतं. कॅवियारची चव ही खारट अक्रोडासारखी लागते.
कॅवियारचे फायदे
> 'क्लिवलॅण्ड क्लिनिक'च्या अहवालानुसार, कॅवियारमध्ये व्हिटॅमिन बी-12 चं प्रमाण अधिक असतं. यामुळे शरीरातील अंतर्गत क्रिया सुरळीत राहण्यासाठी मदत होते. व्हिटॅमिन बी-12 मुळे थकवा दूर होण्यास मदत होते.
> कॅवियारमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचं प्रमाण अधिक असतं. यामुळे बुद्धी तल्लख राहते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्समुळे डोक्यातील नसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचं असतं.
> कॅवियार सामान्यपणे कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये वापरलं जातं. यामध्ये अॅण्टी-एजिंग गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि टवटवीत राहते. हे त्वचेच्या आरोग्यासाठी फार फायद्याचं असतं.
> कॅवियार मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणत असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे गंभीर आजार होण्यापासून संरक्षण मिळतं.
> कॅवियारमध्ये झिंक, मॅग्नेशियम, आर्यन, कॅल्शिएमचं प्रमाण अधिक असतं. यामुळे हाडांनी मजबुती मिळते.