Holi 2024 : प्रल्हाद तर भक्त होता, मग होलिका या राक्षसीची पूजा का करतो? मुलांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगा `ही` गोष्ट
Holi Story For Kids in Marathi : होळी आणि धुलिवंदन हा सण अवघ्या 2 ते 3 दिवसांवर आहे. सगळीकडे याची लगबग पाहायला मिळतेय. हे सगळं पाहून मुलांना आपण हा सण का साजरा करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी मुलांना सांगा या गोष्टी.
सण, उत्सव हे संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या गोष्टी आहेत. ही परंपरा सणांद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत असतात. अशावेळी आपण हे सण का साजरे करतो, याबाबतची माहिती मुलांपर्यंत पोहोचवणे ही पालकांची जबाबदारी आहे. अशावेळी मुलांना पालकांनी होळी, धुलिवंदनशी संबंधीत ही गोष्ट सांगायला हवी.
होळी २४ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. तर त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी धुलिवंदन म्हणजे धुळवड हा रंगाचा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. पण हे करण्यामागचं कारण? आणि रंग का खेळले जातात? याची अनेक प्रश्ने मुलांना पडतात. अशावेळी पालकांनी पुढील कथा मुलांना सांगाव्यात?
प्रल्हाद-होलिका दहन
हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली. तितक्यात नरसिंह खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले.
रंग का उधळतात?
सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी? तेव्हा महादेवांनी वरदान देवून कामदेवाला जीवनदान दिले. व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. हा उत्सव पाच दिवस चालला. फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंग पंचमीला या उत्सवाची सांगता झाली. रंग पंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस. या दिवशी सर्व देव रंग खेळतात, असे समजले जाते. चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते. आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. तऱ्हेतऱ्हेचे फुलांचे रंग, गुलाल याने राधा-कृष्ण होळी खेळतात, असा समज आहे. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. हळूहळू ह्या सणाचे रूप बदलून केवळ दोन दिवस हा उत्सव साजरा केला जाऊ लागला. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हटले जाते.