Why Rasvanti Gruh Named As Navnath Or Kanifnath: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पारा सध्या 40 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. सामान्यपणे रणरणत्या उन्हातून जिवाची लाही लाही होत असताना घशाला कोरड पडल्यावर सर्वात आधी आठवतं ते पाणी. मात्र उन्हाळ्यात पाण्यानंतर ज्या पेयाची सर्वाधिक मागणी असते ते पेय म्हणजे ऊसाचा रस! उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी तात्पुरती सरवंतीगृहे दिसून येतात. तर कायमस्वरुपी रसवंतीगृहांमध्ये तर अनेकदा उन्हाळ्यात पाय ठेवायला जागा नसते एवढी गर्दी पाहायला मिळते. पण तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील सरवंतीगृहांबद्दल एक गोष्ट नोटीस केली असेल की या रसवंतीगृहांची नावं 'नवनाथ' अथवा 'कानिफनाथ' अशीच असतात. पण असं का? हा असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याच प्रश्नाचं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चला तर जाणून घेऊयात या 'नवनाथ' तसेच 'कानिफनाथ' नावांमधील रंजक गोष्ट...


'नवनाथ', 'कानिफनाथ' ही फ्रेंचाइजी आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्वीटरवर डॉक्टर निलेश श्रीनिवास मंत्री यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. शेगावमधील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या मंत्री यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सरवंतीगृहांच्या नावाची रंजक गोष्ट सांगितली आहे. 'नवनाथ' तसेच 'कानिफनाथ' अशी एकाच नावाची  रसवंतीगृह पाहिल्यावर आताच्या पिढीला ही सगळी रसवंतीगृह एकाच माणसाच्या मालकीची आहेत की काय? असं वाटतं. तर कुणाला मॅकडोनाल्ड, 'के.एफ.सी'ची फ्रँचाइजी देतात तसे 'नवनाथ' अथवा 'कानिफनाथ' रसवंती गृहाची देखील  फ्रँचाइजी असते की काय? असा प्रश्नही पडतो असं मंत्री यांनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.


गोष्ट सुरु होते 70 ते 80 वर्षांपूर्वी


'नवनाथ रसवंती गृहामागची कथा' या मथळ्याखाली मंत्री यांनी, "तर नवनाथ रसवंती गृहाच्या नावाची गोष्ट आहे साधारण 70-80 वर्षांपूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्या बोपगाव नावाचं गाव आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने हा तसा दुष्काळी पट्टाच म्हणावा लागेल. पण इथला शेतकरी फार जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर हा शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांचं एवढं पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या ऊसाला हक्काचं मार्केट नव्हतं. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता," असं आपल्या पोस्टमध्ये रसवंती गृहांच्या उद्योगाला सुरुवात कशी झाली याबद्दल लिहिलं आहे.


...अन् मुंबईत ऊसाच्या रसाने जादू केली


"अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथं गेल्यावर त्याला कळाल की इथं आपल्या ऊसाला भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी ऊस असायचे. लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं. पुरंदरच्या गोड ऊसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी,  बिव्हरी अशा गावातली बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथं जातील तिथं दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांमध्ये विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं," असं मंत्री यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.


'नवनाथ' किंवा 'कानिफनाथ' हेच नाव का देतात?


मग रसवंतीला 'नवनाथ' किंवा 'कानिफनाथ' हेच नाव का दिलं गेलं? या प्रश्नालाही पोस्टमध्ये पुढे मंत्री यांनी उत्तर दिलं आहे. मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्या बोपगावमधून हे सरवंती चालवणारे महाराष्ट्रभर पसरले त्या बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाच्या 9 नाथांपैकी एक कानिफनाथ स्वामी तपश्चर्येला बसले होते असं सांगतात. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदर तालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी 'नवनाथ' ठेवलं तर कुणी 'कानिफनाथ' ठेवलं," असं म्हटलं आहे.


हत्ती कनेक्शन


“ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली अशी दंतकथा आहे. त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस, रस, गूळ आवडतो. इतका यामागील साधा अर्थ आहे. दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे. त्यामुळे 'नवनाथ रसवंती', 'कानिफनाथ रसवंती' ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला. 'नवनाथ' अथावा 'कानिफनाथ' रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीगृहवाले सुद्धा तेच नाव वापरू लागले," असं मंत्री यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.




ऊसाच्या रसाच्या मशीनला घुंगरु का बांधतात?


"पूर्वी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढला जायचा. पुढे काळानुरुप बैल गेले अन् त्याजी लोखंडी मशीन्स आले. पण या बैलांनी आपल्याला एकेकाळी आपल्याला रसवंतीच्या माध्यमातून जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनच्या चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे," असंही पोस्टच्या शेवटी मंत्री यांनी सांगितलं आहे.