Dasara 2023 : दसऱ्याला आपट्याची पाने `सोने` म्हणून का लुटतात?
Dasara 2023 : नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी `दसरा` हा दिवस साजरा केला जातो. गेल्या नऊ दिवसांपासून देशभरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला. उद्या मंगळवारी सगळीकडे दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
Apta Leaf Importance : चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने 'सोने' म्हणून का लुटतात? ते जाणून घेऊया.
आपट्याने पान वाटण्यामागील पौराणिक कथा?
कौत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. या कौत्साने गुरुकुल पद्धतीने ज्ञान संपादन केले. गुरूला दक्षिणा घेण्याच्या वेळेस शिष्याच्या प्रगतीवरच समाधान मानणाऱ्या वरतंतु ऋषींनी त्याला नकार दिला. मात्र कौत्साच्या आग्रहाखातर त्यांनी सांगितले की मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्साने रघुराजापुढे हात पसरले पण त्याने नुकतीच सर्व संपत्ती यज्ञात दान केली होती. मात्र दारी आलेला याचक रिकाम्या हाती पाठवणे योग्य न वाटल्याने पराक्रमी रघुराजाने कौत्साकडे काही वेळ मागितला.त्याने कुबेरावर हल्ला करून संपत्ती मिळवायची आणि दान करायची अशी शक्कल लढवली. पण या गोष्टीची खबर लागताच कुबेराने राजाला सांगितले की तीन दिवसांत तो स्वखुशीने ही मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या दिवशी जंगलात कौत्स आपटय़ाच्या झाडाजवळ असतानाच त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा खच पडला. आनंदाने कौत्साने विनंती केल्यावर त्याच्या गुरुदेवांनी 14 कोटी मुद्रा घेतल्या तरीही असंख्य मुद्रा पानोपानी शिल्लक राहिल्या होत्या. गुरुदक्षिणा दिल्याच्या समाधानात कौत्साने गुरूंच्या आदेशावरून बाकी मुद्रा पानांसकटच झाडावरून तोडून इतरांना वाटल्या. म्हणून आजही दसर्याच्या दिवशी सोन्याच्या रूपात आपट्याची पानं वाटण्याची प्रथा कायम आहे.
पुराणातील कथा
पुराणातील कथेनुसार प्रभु रामचंद्र 12 वर्ष वनवासात जाण्यापूर्वी त्यांनी शमीच्या झाडांमध्ये आपली शस्त्र ठेवली होती. दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस असल्याने अनेकजण या दिवशी हमखास सोनं खरेदी करतात. या दिवशी शुभ कार्याची सुरूवात करताना कोणताही विशिष्ट मुहूर्त बघण्याची गरज नसते.
आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा
दसर्याच्या दिवशी मित्आरपरिवाराला, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे.