Benefits Of Drawing Rangoli: दिवाळीतील पाच दिवस प्रत्येकाच्या घरात सजावट करण्यात येते. या दिवसांत घरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीच्या दिवसांत घरासमोर दिवे लावले जातात. तर, महिला छान रांगोळ्या काढतात. दारासमोर छान रांगोळी काढली जाते. रांगोळीत सुबक रंग मन प्रसन्न करतात. खरं तर पूर्वी दररोज घरासमोर रांगोळी काढली जायची. मात्र, हल्ली ती परंपरा मागे पडत चालली आहे. पण अजूनही दसरा, दिवाळीच्या दिवसांत रांगोळी काढली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांगोळीचेही खूप प्रकार आहेत. संस्कार भारती, ठिपक्यांची रांगोळी असे अनेक प्रकार आहेत. पण दारासमोर रांगोळी का काढली जाते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? दारासमोर रांगोळी दिसायला तर सुबक दिसतेच मात्र घरासमोर रांगोळी काढण्याचे इतर अनेकही फायदे आहेत. रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा असून त्याला काही धार्मिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत. रांगोळीची परंपरा मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीपासून सुरू असल्याचा उल्लेख सापडतो. 


रांगोळीचा अर्थ काय?


संस्कृत भाषेत रांगोळीला 'रंगवल्ली' असे म्हटले जाते. रंगाद्वारे भावना व्यक्त करणे असा या शब्दाचा अर्थ होतो. भारतात अनेक ठिकाणी अल्पना असंही रांगोळीला म्हणतात. अल्पना हा शब्द अलेपना या संस्कृत शब्दापासून तयार केला आहे. 


रांगोळी का काढली जाते?


प्राचीन काळात लोकांचा असा विश्वास होता की कलात्मक चित्रांमुळं शहरं आणि गाव धनधान्याने समृद्ध राहतात तसेच वाईट शक्तींच्या प्रभावापासून सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून 'रांगोळी' धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभाच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. असं म्हणतात की रांगोळी घरात येणाऱ्या 'अशुभ' शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. 


वैज्ञानिक कारण काय?


रांगोळी काढण्यासाठी आपण खाली जमिनीवर बसतो. त्यामुळं गुडघ्यांची हालचाल होते. सकाळी सकाळी आपोआपच गुडघ्यांचाही व्यायाम होतो. रांगोळीसाठी आपण हाताच्या बोटांचे समोरचे टोक वापरतो. बोटाच्या समोरच्या टोकांची आपण जितकी हालचाल करतो तितकाच मेंदू अधिक विकसित होतो, असं म्हटलं जातं. Celebrity_Katta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 


रांगोळी कशी बनवतात?


रांगोळी एका विशिष्ट्य खडकापासून तयार केली जाते. या खडकाचे नाव 'डोलोमाइट' असं आहे. सर्वप्रथम हा दगड  भट्टीत भाजून, बारीक कुटून मग वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात. रांगोळीच्या दगडाला 'शिरगोळे' असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार होतो. पांढऱ्या रांगोळीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार केली जाते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)